निर्गम 35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)शब्बाथाविषयीचे नियम 1 मोशेने इस्राएल लोकांची सगळी मंडळी जमवली व त्यांना म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्या : 2 सहा दिवस काम करावे, पण सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय; त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जिवे मारावे. 3 शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या वसतिस्थानांत विस्तव पेटवू नये. परमेश्वराप्रीत्यर्थ आणायचे अर्पण ( निर्ग. 25:1-9 ) 4 मोशे इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे : 5 तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ; 6 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्यांचे केस; 7 लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी, तहशांची कातडी, बाभळीचे लाकूड, 8 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले, 9 एफोद व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावीत. निवासमंडपातील वस्तू ( निर्ग. 39:32-43 ) 10 तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध ह्रदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे 11 निवासमंडप, त्याचा तंबू व त्यावरील आच्छादन, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व उथळ्या; 12 कोश व त्याचे दांडे, दयासन व अंतरपट; 13 मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर; 14 प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल; 15 धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, व निवासमंडपाच्या दारासाठी पडदा; 16 होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक; 17 अंगणाचे पडदे, त्याचे खांब, उथळ्या व अंगणाच्या फाटकासाठी पडदा; 18 निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी मेखा व तणावे; 19 पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि त्याच्या मुलांची वस्त्रे. लोक अर्पणे आणतात 20 मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली. 21 नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. 22 ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्रीपुरुष आले आणि त्यांनी नथी, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले. 23 ज्या ज्या पुरुषाजवळ निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत, तलम सणाचे कापड, बकर्यांचे केस, लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी होती त्याने ते ते आणले. 24 चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणार्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला. 25 ज्या स्त्रिया सुबुद्ध ह्रदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हातांनी विणलेले तलम सणाचे कापड त्यांनी आणले; 26 आणि ज्या स्त्रियांच्या अंत:करणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली, त्या सर्वांनी बकर्यांचे केस कातले. 27 सरदारांनी एफोद व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने, 28 आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धूपासाठी मसाला आणला. 29 जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंत:करणात स्फूर्ती झाली त्यांनी त्यांनी ही अर्पणे आणली. बसालेल आणि अहलियाब ह्यांची नेमणूक ( निर्ग. 31:1-11 ) 30 मग मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पाहा, यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे; 31 आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे; 32 तो कलाकुसरीची कामे करील; सोने, रुपे व पितळ ह्यांची कामे करील; 33 जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील; लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. 34 परमेश्वराने त्याच्या ठायी आणि दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. 35 कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तर्हेचे कसबी काम करणारे, कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India