Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मोशेचा जन्म

1 लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली.

2 ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले.

3 पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्यांचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली; त्या पेटार्‍यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यांत नेऊन ठेवले;

4 आणि त्याचे पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली.

5 मग फारोची मुलगी नदीवर स्नान करायला आली; तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लव्हाळ्यांमध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला; तो आणायला तिने आपल्या एका दासीला सांगितले.

6 तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले; आणि पाहा, तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, “हे कोणातरी इब्र्याचे बालक आहे.”

7 तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “आपल्याकरता मुलास दूध पाजण्यासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलावू काय?”

8 फारोच्या मुलीने तिला म्हटले, “जा बोलाव.” तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली.

9 फारोच्या मुलीने तिला म्हटले, “ह्या मुलाला घेऊन जा, आणि माझ्याकरता ह्याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन.” मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली.

10 ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली, आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले. ती म्हणाली, “कारण मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.” मोशे मिद्यान देशास पळून जातो

11 काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांचे काबाडकष्ट पाहिले; त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदांपैकी एका इब्र्याला कोणी मिसरी मारत असलेला त्याला दिसला.

12 तेव्हा त्याने इकडेतिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिसर्‍यास ठार करून त्याला वाळूत लपवले.

13 तो पुन्हा दुसर्‍या दिवशी बाहेर गेला तेव्हा दोघा इब्री मनुष्यांना एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले; तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?”

14 तो त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिसर्‍यास जिवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?” तेव्हा मोशेला भीती वाटली; तो म्हणाला, “खरोखर ती गोष्ट फुटली.”

15 फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले; पण मोशे फारोपुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहचला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला.

16 तेथील मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरडामेंढरांना पाजण्याकरता ते डोणीत भरत होत्या.

17 इतक्यात धनगरांनी येऊन त्यांना हाकून लावले; तेव्हा मोशेने उठून त्या मुलींना मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजले.

18 त्या आपला बाप रगुवेल ह्याच्याकडे आल्या तेव्हा तो म्हणाला, “आज तुम्ही लवकर कशा आलात?”

19 त्या म्हणाल्या, “धनगरांच्या हातून एका मिसरी मनुष्याने आमची सुटका केली, आणि आमच्यासाठी पाणीदेखील काढून कळपास पाजले.”

20 तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? त्या माणसाला तुम्ही तेथे का सोडले? त्याला जेवायला बोलावून आणा.”

21 आणि मोशे त्या मनुष्याजवळ राहण्यास कबूल झाला; त्याने मोशेला आपली मुलगी सिप्पोरा दिली.

22 तिला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव गेर्षोम ठेवले; तो म्हणाला, “कारण मी परदेशात उपरा आहे.”

23 बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.

24 देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले,

25 म्हणून देवाने इस्राएलवंशजांकडे दृष्टी लावली; देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan