Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देव मान्ना देतो

1 मग एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सीनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहचला.

2 त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन ह्यांच्या संबंधाने कुरकुर केली.

3 इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.”

4 तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करीन; आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन.

5 सहाव्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते, इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे.”

6 मोशे आणि अहरोन सर्व इस्राएल लोकांना म्हणाले, “परमेश्वरानेच तुम्हांला मिसर देशातून आणले हे तुम्हांला संध्याकाळी कळून येईल,

7 आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही असे कोण की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?”

8 मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हांला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल तेव्हा असे होईल; कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे.”

9 मोशे अहरोनाला म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.”

10 अहरोन इस्राएलांच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तेव्हा ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले.

11 परमेश्वर मोशेला म्हणाला,

12 “इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”

13 संध्याकाळी असे झाले की लावे पक्षी येऊन सर्व छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दंव पडले.

14 हे पडलेले दंव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले.

15 इस्राएल लोक ते पाहून एकमेकांना म्हणाले, “हे काय?”1 कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “परमेश्वराने तुम्हांला खायला दिले आहे ते हेच.

16 परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही की, प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे; ज्याच्या-त्याच्या डेर्‍यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी, म्हणजे आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एकेक ओमर जमा करावे.”

17 इस्राएल लोकांनी तसे केले; कोणी कमी, कोणी जास्त गोळा केले.

18 त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले, तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही; प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले होते.

19 मोशेने त्यांना सांगितले की, “कोणीही ह्यांपैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.”

20 तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली; त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला.

21 ह्या प्रकारे ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे गोळा करीत; आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून जाई.

22 सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी दोन ओमर गोळा केले, तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळवले.

23 तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विसाव्याचा दिवस, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे; तुम्हांला भाजायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा.”

24 मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले; पण त्याची घाण सुटली नाही की त्यात किडे पडले नाहीत.

25 मग मोशे म्हणाला, “ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बाथ आहे, आज रानात ते तुम्हांला मिळायचे नाही.

26 सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे; सातवा दिवस शब्बाथ आहे, त्या दिवशी काहीएक नसणार.”

27 तरी सातव्या दिवशी ते गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेले, पण त्यांना काही मिळाले नाही.

28 तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळायचे तुम्ही कोठवर नाकारणार?

29 पाहा, परमेश्वराने तुम्हांला शब्बाथ दिला आहे म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हांला दोन दिवसांचे अन्न देतो. सातव्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.”

30 ह्याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.

31 इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना1 ठेवले. ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.

32 मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, ह्यातले एक ओमरभर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा; मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणून रानात कोणत्या प्रकारचे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल.”

33 तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना घाल; ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे.”

34 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अहरोनाने ठेवले.

35 इस्राएल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहचेपर्यंत चाळीस वर्षे मान्ना खात होते. कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहचेपर्यंत ते मान्ना खात होते.

36 ओमर हा एफाचा दहावा भाग आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan