निर्गम 11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)प्रथमवत्साच्या मृत्यूची पीडा येणार अशी सूचना 1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी फारोवर आणि मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन, त्यानंतर तो तुम्हांला येथून जाऊ देईल; आणि तो जाऊ देताना तुम्हांला येथून कायमचे घालवून देईल. 2 तू लोकांना सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजार्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावेत.” 3 अशा प्रकारे मिसरी लोकांची इस्राएल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. शिवाय मिसर देशात फारोचे सेवक व सामान्य लोक ह्यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. 4 मग मोशे म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो की, आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिसर देशामधून फिरेन. 5 तेव्हा मिसराच्या सिंहासनावर बसणार्या फारोपासून ते जात्यावर बसणार्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथमवत्स मरतील. 6 पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी होणार नाही असा मोठा हाहाकार मिसर देशभर उडेल. 7 तथापि इस्राएल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशूवरही, कुत्रादेखील भुंकणार नाही; ह्यावरून मी परमेश्वर मिसरी लोकांत व इस्राएल लोकांत कसा भेद ठेवतो हे तुम्हांला कळेल. 8 तेव्हा ते तुझे सर्व सेवक माझ्याकडे येऊन पाया पडून म्हणतील की, आपल्या परिवारासह आपण निघून जावे. त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतप्त होऊन फारोपुढून निघून गेला. 9 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिसर देशात माझी पुष्कळ अद्भुते घडावीत म्हणून फारो तुमचे ऐकणार नाही.” 10 मोशे व अहरोन ह्यांनी फारोसमोर ही सर्व अद्भुते केली, तरी परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि त्याने इस्राएल लोकांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India