Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मिसर देशात इस्राएल लोकांना सोसावा लागलेला छळ

1 याकोबाबरोबर जे इस्राएलवंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही :

2 रऊबेन, शिमोन, लेवी व यहूदा;

3 इस्साखार, जबुलून व बन्यामीन;

4 दान व नफताली, गाद व आशेर.

5 याकोबापासून झालेले एकंदर सत्तर जण होते; योसेफ हा मिसरात होताच.

6 नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्व जण मरण पावले.

7 इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला.

8 पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला.

9 तो आपल्या लोकांना म्हणाला, “पाहा, ह्या इस्राएल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत;

10 तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील.”

11 त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगारकाम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली;

12 पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला;

13 म्हणून मिसरी लोक इस्राएलवंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले;

14 त्यांना मातीचा गारा व विटा करायला आणि शेतात हरतर्‍हेची कामे करायला लावत. असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला; कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत.


इस्राएली मुलग्यांच्या हत्येचा कट

15 दोन इब्री सुइणी होत्या; एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा; त्यांना मिसरच्या राजाने आज्ञा केली की,

16 “तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता, प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि मुलगा असला तर त्याला जिवे मारा; पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा.”

17 त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे न करता मुलगेही जिवंत राहू दिले.

18 तेव्हा मिसरी राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले?”

19 त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “इब्री बायका काही मिसरी बायकांप्रमाणे नाहीत; त्या फार जोमदार आहेत, आणि सुईण जाऊन पोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.”

20 ह्याबद्दल देवाने सुइणींचे कल्याण केले, इस्राएल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले.

21 त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली.

22 तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा केली की, “जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan