Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

एस्तेर 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


हामानाचे कारस्थान उधळले जाते व तो फाशी जातो

1 ठरल्याप्रमाणे राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीस गेले.

2 दुसर्‍या दिवशी भोजनसमयी द्राक्षारस पिण्याचे वेळी राजाने एस्तेरला पुन्हा विचारले, “एस्तेर राणी, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी तिच्याप्रमाणे करण्यात येईल.”

3 मग एस्तेर राणी म्हणाली, “महाराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे.

4 माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्‍याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”

5 अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “असे करण्याचे धाडस करणारा कोण व तो कोठे आहे?”

6 एस्तेर म्हणाली, “हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच.” हे ऐकून राजा व राणी ह्यांच्यापुढे हामान घाबरला;

7 तेव्हा राजा क्रोधायमान होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला; तेव्हा ‘मला प्राणदान द्या’ अशी विनवणी करीत हामान एस्तेर राणीपुढे उभा राहिला; कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे हे त्याला समजून चुकले.

8 मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला असता एस्तेरच्या मंचकावर हामानास ओठंगलेले त्याने पाहिले, तेव्हा राजा म्हणाला, “ह्या घरात आणि माझ्यासमोर हा राणीवर जबरदस्ती करू पाहतो काय?” राजाच्या तोंडून हे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हामानाचे तोंड झाकले.

9 राजाच्या तैनातीस असलेल्या खोजांपैकी हर्बोना नावाचा एक खोजा म्हणाला, “पाहा, हामानाच्या येथे पन्नास हात उंचीचा एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे; ज्या मर्दखयाने राजाच्या हिताची खबर दिली त्याला टांगण्यासाठी हामानाने तो उभा केला आहे.” राजाने म्हटले, “त्याच खांबावर ह्याला फाशी द्या.”

10 तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan