Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

एस्तेर 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मर्दखयाचा मानसन्मान करणे हामानाला भाग पडते

1 त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला

2 त्यात हा मजकूर होता : अहश्वेरोश राजाच्या द्वारपाळांपैकी दोन खोजे बिग्थान व तेरेश ह्यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखयाने खबर दिली.

3 तेव्हा राजाने विचारले की, “ह्या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय?” त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्याला सांगितले, “त्याच्या बाबतीत काहीएक करण्यात आले नाही.”

4 राजाने विचारले, “चौकात कोण आहे?” त्या वेळी, तयार केलेल्या फाशी देण्याच्या खांबावर मर्दखयास फाशी द्यावे अशी राजाकडे विनंती करण्यास हामान राजमंदिराच्या बाहेरल्या चौकात आला होता.

5 राजसेवकांनी राजाला सांगितले, “हामान चौकात उभे आहेत.” राजा म्हणाला, “त्याला आत बोलवा.”

6 हामान आत आल्यावर राजाने त्याला विचारले, “एखाद्या मनुष्याचा मानसन्मान करण्याचे राजाच्या मर्जीस आल्यास त्या माणसाची कशी काय संभावना करावी?” हामान आपल्या मनात म्हणाला, “माझ्याहून दुसर्‍या कोणाची अधिक संभावना करण्याचे राजाच्या मर्जीस येणार?”

7 हामान राजाला म्हणाला, “एखाद्याचे गौरव करण्याचे महाराजांच्या मर्जीस आल्यास

8 महाराज धारण करतात तो पोशाख आणवावा, त्याप्रमाणेच ज्या घोड्यावर महाराज स्वारी करतात तो व महाराजांच्या मस्तकी जो राजमुकुट ठेवतात तो आणवावा;

9 मग तो पोशाख व घोडा महाराजांच्या कोणाएका मोठ्या सरदाराच्या हाती देऊन महाराज गौरव करू इच्छितात त्याला त्याने तो पोशाख लेववावा. त्या घोड्यावर बसवून नगराच्या रस्त्यातून त्याची मिरवणूक काढावी आणि त्याच्यापुढे ललकारावे की, ‘राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची संभावना ह्या प्रकारे होते.”’

10 राजा हामानास म्हणाला, “त्वरा करून हा पोशाख व हा घोडा घे आणि राजद्वारी मर्दखय बसला आहे त्याची संभावना तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर, तू बोललास तसे करण्यात काहीएक अंतर होऊ नये.”

11 हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखयाला सजवले आणि शहराच्या रस्त्यातून त्याला मिरवून त्याच्यापुढे ललकारले की, “राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची ह्या प्रकारे संभावना होईल.”

12 मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला.

13 मग हामानाने आपली स्त्री जेरेश व आपले सर्व मित्र ह्यांना आपल्यावर आलेला प्रसंग विदित केला. तेव्हा त्याचे बुद्धिमान मित्र व त्याची बायको हे त्याला म्हणाले, “ह्या मर्दखयापुढे तुमचा अधःपात होऊ लागला आहे; तो जर यहूदी वंशातला असला तर तुमचे वर्चस्व व्हायचे नाही, त्याच्यापुढे तुमचा अध:पात होणार.”

14 ती त्याच्याशी बोलत आहेत तोच राजाचे खोजे आले आणि एस्तेर राणीने तयार केलेल्या मेजवानीस ते हामानास लगबगीने घेऊन गेले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan