एस्तेर 5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)एस्तेर राजाला व हामानाला मेजवानीचे आमंत्रण देते 1 तिसर्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता. 2 राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिच्यावर कृपादृष्टी झाली; आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला. 3 राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.” 4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्याला आपण हामानास घेऊन यावे.” 5 राजा म्हणाला, “जा, हामानास लवकर घेऊन या, म्हणजे एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे करू.” मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास राजा व हामान हे गेले. 6 जेवताना द्राक्षारस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेरला विचारले, “तुझा काय अर्ज आहे? तो मान्य केला जाईल; तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी तिच्याप्रमाणे करण्यात येईल.” 7 एस्तेर म्हणाली, “माझा अर्ज व मागणी हीच : 8 महाराजांची माझ्यावर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार तिला महाराजांनी व हामानाने यावे, मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागायचे ते मागेन.” मर्दखयासाठी फाशीचा खांब 9 त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला; पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला; 10 तरी आपला क्रोध आवरून हामान घरी गेला आणि त्याने आपले इष्टमित्र व आपली स्त्री जेरेश ह्यांना बोलावणे पाठवून आणले. 11 आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणांस कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक ह्यांच्यावरील उच्च पद दिले, हे सर्व त्याने त्यांना निवेदन केले. 12 हामानाने त्यांना आणखी सांगितले की, “एस्तेर राणीने मेजवानी दिली, त्या मेजवानीस तिने राजाबरोबर माझ्याखेरीज दुसर्या कोणालाही बोलावले नाही; उद्याही तिने मला राजाबरोबर आमंत्रण दिले आहे. 13 एवढे असूनही तो मर्दखय यहूदी राजद्वारी बसलेला माझ्या दृष्टीला पडत आहे तोवर हे सर्व व्यर्थ आहे.” 14 तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, “पन्नास हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजाला विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी द्यावे; मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा.” ही गोष्ट हामानास पसंत पडून त्याने फाशीचा खांब तयार करवून घेतला. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India