Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इफिसकरांस 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे म्हणून सभासदांचे ऐक्य असावे

1 म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला;

2 पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या;

3 आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा.

4 तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे.

5 प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच,

6 सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.

7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे.

8 म्हणून तो म्हणतो, “त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना1 कैद करून नेले, व मानवांना देणग्या दिल्या.”

9 (“त्याने आरोहण केले,” ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी2 उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे?

10 जो खाली उतरला होता त्यानेच सर्वकाही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर ‘आरोहण केले.’)

11 आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;

12 ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे.

13 देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले;

14 ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.

15 तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.

16 त्याच्यापासून पुरवठा करणार्‍या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते.


जुना जीवितक्रम व नवा जीवितक्रम

17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;

18 त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;

19 ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे.

20 परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही!

21 तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल;

22 ते असे की, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे;

23 आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे;

24 आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.


दिनचर्येकरता नियम

25 म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.

26 तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये;

27 आणि सैतानाला वाव देऊ नका.

28 चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.

29 तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.

30 देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात.

31 सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवोत;

32 आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan