इफिसकरांस 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)देवाच्या रहस्याचे प्रकटीकरण करण्याच्या कामगिरीवर पौलाची रवानगी 1 ह्या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. 2 देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल; 3 म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, 4 ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हांला समजेल. 5 ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांना कळवण्यात आले नव्हते. 6 ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. 7 देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेणेकरून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. 8 मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी; 9 आणि ज्याने [येशू ख्रिस्ताद्वारे] सर्वकाही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे; 10-11 ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. 12 त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. 13 म्हणून मी विनंती करतो की, तुमच्याप्रीत्यर्थ मला होणार्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हांला भूषणावह आहेत. अंतःकरणामध्ये ख्रिस्ताने वास करावा म्हणून प्रार्थना 14-15 ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या [प्रभू येशू ख्रिस्ताच्या] पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, 16 त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे; 17 ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून, 18 तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती, 19 हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. 20 जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणार्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे, 21 त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यानपिढी युगानुयुग गौरव असो. आमेन. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India