Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

उपदेशक 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


जीवनातील विसंगती

1 ह्या सगळ्यांचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला; ते हे की नीतिमान व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत; आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्याला कळत नाही; हे सर्वकाही त्याला पुढे प्राप्त होणार असते.

2 जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्‍याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्‍याची सारखीच दशा होते.

3 भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते; मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात.

4 जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा.

5 आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.

6 त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही.

7 जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.

8 तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत; तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो.

9 देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे; ह्या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्यांचे हे फळ तुला आहे.

10 जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.

11 मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.

12 कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.


सामर्थ्यापेक्षा ज्ञान थोर

13 मी भूतलावर पुढील प्रकारचे ज्ञान पाहिले, ते मला फार थोर भासले; ते असे :

14 एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते; त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्याला वेढा दिला व त्याच्यासमोर मोठाले मोर्चे लावले.

15 त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही.

16 तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे; तथापि गरिबाची अक्कल लोक तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत.

17 मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे.

18 युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan