उपदेशक 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी भूतलावर एक अनिष्ट पाहिले; ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते. 2 ते हे : कोणा मनुष्याला देव धन, संपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला पाहिजे ते मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही; तरी देव त्याला ते भोगू देत नाही, ते परकाच भोगतो; हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय. 3 कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो. 4 कारण तो शून्यावस्थेत येतो व अंधकारात नाहीसा होतो; त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते. 5 त्याप्रमाणेच सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही; म्हणून ह्याला त्या दुसर्या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते. 6 हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना? 7 मनुष्याचे सर्व परिश्रम पोटासाठी आहेत, तरी त्याच्या जिवाची तृप्ती म्हणून होत नाही. 8 मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक लाभ होतो? त्याप्रमाणेच जो दीन असून लोकांत कसे वागावे हे जाणतो त्याला तरी काय लाभ? 9 मन इकडेतिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. 10 जे काही झाले आहे त्याला पूर्वीच नाव दिले होते; मनुष्याचे काय होणार हेही पूर्वीच माहीत असते; त्याच्याहून जो समर्थ त्याच्याशी त्याला झगडता येणार नाही. 11 व्यर्थतेची वृद्धी करणार्या अशा बहुत गोष्टी आहेत; त्यांपासून मनुष्याला काय लाभ? 12 मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल? |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India