Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

उपदेशक 5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


अविचाराने बोलणे धोक्याचे

1 तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक; बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे; आपण अधर्म करतो हे त्यांना कळत नाही.

2 बोलण्याची घाई करू नकोस; देवासमोर कोणताही उद्‍गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नकोस; कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस; म्हणून तुझे बोलणे अल्प असावे.

3 काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रकट होते.

4 तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नकोस, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो; जो नवस तू केला असेल त्याची फेड कर.

5 नवस करावा आणि तो फेडू नये ह्यापेक्षा तो मुळीच न करणे बरे.

6 तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नकोस. मी चुकून बोललो असे दिव्यदूतासमोर म्हणू नकोस; तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावीत?

7 बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी होत; पण तू देवाचे भय धर.


जीवनाची व्यर्थता

8 एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व नीतिमत्ता ह्यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नकोस; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.

9 शेतात मन घालणारा राजा देशाच्या कल्याणास सर्वस्वी कारण होतो.

10 ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही; हेही व्यर्थ!

11 संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात; डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो?

12 कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.

13 धनिक धन राखून ठेवतो ते त्याच्या हानीला कारण होते; हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे;

14 त्याचे ते धन एखाद्या अनिष्ट प्रसंगामुळे विलयास जाते; आणि त्याला पुत्र झाला असता त्याच्या हाती काही येत नाही.

15 तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमाचे काहीही फळ आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही.

16 तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे; त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ?

17 तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात.

18 मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे : मनुष्याने खावे, प्यावे व ह्या भूतलावर जे श्रम तो करतो त्या सर्वांत देवाने त्याला दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे; कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे.

19 कोणा मनुष्याला देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल, तर ही देवाची देणगीच समजावी.

20 त्याला आपल्या आयुष्याच्या दिवसांची फारशी चिंता वाटणार नाही; देव त्याच्या मनाच्या आनंदास अनुकूल असतो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan