उपदेशक 12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील. 2 त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. 3 त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणार्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणार्या अंध होतील. 4 जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील; पक्ष्याच्या शब्दानेदेखील त्याच्या निद्रेचा भंग होईल; सर्व गायनस्वर2 मंदावतील. 5 ते चढावाला भितील; रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यांना वाटेल; बदाम फुलेल; टोळसुद्धा जड असा वाटेल; वासना निमेल; कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे, आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्यागल्ल्यांतून फिरतील. 6 मग चांदीचा दोर तुटेल; सोन्याचा कटोरा फुटेल; झर्याजवळ घडा फुटेल; आडावरचा रहाट मोडेल. 7 तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. 8 व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक3 म्हणतो, सर्वकाही व्यर्थ! मानवाचे कर्तव्य 9 उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली. 10 सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे. 11 ज्ञान्यांची वचने पराण्यांसारखी असतात; सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे असतात; एकाच मेंढपाळांपासून ती प्राप्त झाली आहेत. 12 ह्याखेरीज, माझ्या पुत्रा, असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणवते. 13 आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. 14 सगळ्या बर्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India