Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

अनुवाद 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराची पवित्र प्रजा
( निर्ग. 34:11-16 )

1 जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल;

2 आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस.

3 त्यांच्याशी सोयरीक करू नकोस; आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नकोस व त्यांच्या मुली आपल्या मुलांना करू नकोस;

4 कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवतील; आणि अन्य देवांची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील.

5 त्या लोकांशी तुम्ही अशा प्रकारे वागावे : त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती तोडून टाका आणि त्यांच्या कोरीव मूर्ती अग्नीत जाळून टाका.

6 कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्‍या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे.

7 परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हांला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे; उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता;

8 पण परमेश्वराने तुम्हांला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून बाहेर आणले, ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.

9 तेव्हा हे लक्षात घे की, तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे; जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो;

10 जे त्याचा द्वेष करतात त्यांच्या डोळ्यांदेखत तो त्यांचे पारिपत्य करून त्यांचा नाश करतो. जो त्याचा द्वेष करतो त्याच्या बाबतीत विलंब न लावता त्याच्या डोळ्यांदेखत तो त्याचे पारिपत्य करतो.

11 म्हणून जी आज्ञा आणि जे विधी व नियम मी आज तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक पाळ. आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद


( लेवी. 26:3-13 ; अनु. 28:1-14 )

12 तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चाललात तर तुमचा देव परमेश्वर तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार पाळून तुमच्यावर दया करील.

13 तो तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील; जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ वाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षारस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेरडामेंढरांची वाढ ह्या बाबतीत तुला बरकत देईल.

14 तू सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आशीर्वादित होशील; तुझ्यातला किंवा तुझ्या पशूंतला कोणी नर किंवा मादी वांझ राहणार नाही;

15 आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करील. मिसर देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहेत, त्यांतली एकही तुला लागणार नाही; पण तुझ्या सर्व द्वेष्ट्यांना तो त्या लावील.

16 जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा संहार कर; त्यांची कीव करू नकोस; त्यांच्या देवांची सेवा करू नकोस, तसे करणे तुला पाशवत होईल.

17 एखादे वेळी तू आपल्या मनात म्हणशील की, ‘ही राष्ट्रे माझ्यापेक्षा मोठी आहेत, मी त्यांना कसे घालवून देऊ?’

18 पण त्यांना भिऊ नकोस, तुझा देव परमेश्वर ह्याने फारोचे व सर्व मिसर देशाचे काय केले हे चांगले आठव.

19 तू प्रत्यक्ष पाहिलेली संकटे, चिन्हे व चमत्कार, तसेच पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या योगे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला काढून आणले हेही चांगले आठव. ज्या राष्ट्रांची तुला भीती वाटत आहे त्या सर्वांचे तुझा देव परमेश्वर तसेच करील.

20 ह्याखेरीज तुझा देव परमेश्वर त्यांच्यामध्ये गांधीलमाशा पाठवील, मग त्यांच्यापैकी जे वाचले असतील आणि तुझ्यापासून लपले असतील त्यांचाही नाश होईल.

21 त्यांना पाहून घाबरू नकोस; कारण तुझा देव परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तो महान व भययोग्य देव आहे.

22 तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून हळूहळू घालवील; त्यांचा एकदम संहार करू नकोस, केलास तर वनपशू फार होऊन ते तुला उपद्रव देतील.

23 तरी तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हाती देईल आणि त्यांचा समूळ नाश होईपर्यंत त्यांना गोंधळात टाकील.

24 तो त्यांचे राजे तुझ्या हाती देईल आणि त्यांचे नाव तू पृथ्वीवरून1 नष्ट करशील. त्यांतला कोणीही शेवटपर्यंत तुझ्याशी सामना करणार नाही, तूच त्यांचा संहार करशील.

25 त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नीत जाळून टाका; त्यांच्यावरील सोन्यारुप्याचा लोभ धरू नकोस व ते स्वतःकरता ठेवून घेऊ नकोस, घेशील तर त्यामुळे पाशात पडशील; कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.

26 कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नकोस, आणशील तर तूही तिच्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील; तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan