Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

अनुवाद 31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मोशेनंतर होणारा नेता यहोशवा

1 मोशेने जाऊन सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली.

2 तो त्यांना म्हणाला, “मी आज एकशेवीस वर्षांचा आहे; ह्यापुढे मला ये-जा होणार नाही; शिवाय ‘तुला ह्या यार्देनेपलीकडे जायचे नाही,’ असे मला परमेश्वराने सांगितले आहे.

3 तुझा देव परमेश्वर हा तुझ्यापुढे पलीकडे जाईल; तो त्या राष्ट्रांचा तुझ्यासमोर संहार करील व तू त्यांचा ताबा घेशील; परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुझ्यापुढे चालेल.

4 परमेश्वराने अमोर्‍यांचे राजे सीहोन व ओग ह्यांचा व त्यांच्या प्रदेशाचा संहार केला तसाच ह्यांचाही करील.

5 परमेश्वर त्यांना तुमच्या हवाली करील तेव्हा त्यांचे मी तुम्हांला दिलेल्या संपूर्ण आज्ञेप्रमाणे करा.

6 खंबीर हो, हिंमत धर, त्यांना भिऊ नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही.”

7 मग मोशेने यहोशवाला बोलावून सर्व इस्राएलांदेखत त्याला सांगितले : “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश ह्यांना देण्याची शपथ परमेश्वराने ह्यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला ह्या लोकांबरोबर जायचे आहे आणि तो त्यांना वतन म्हणून मिळवून द्यायचा आहे.

8 तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे; तो तुझ्याबरोबर असेल; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही; भिऊ नकोस व कचरू नकोस.”


दर सात वर्षांच्या अखेरीस नियमशास्त्राचे वाचन व्हावे

9 मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय याजक आणि इस्राएल लोकांचे सगळे वडील ह्यांच्या स्वाधीन केले.

10 तेव्हा मोशेने त्यांना आज्ञा केली की, “दर सात वर्षांच्या अखेरीस म्हणजे कर्जमाफीच्या ठरावीक वर्षी, मांडवांच्या सणाच्या वेळी,

11 जे स्थान तुझा देव परमेश्वर निवडील तेथे, त्याच्यासमोर सर्व इस्राएल लोक हजर होतील तेव्हा, हे नियमशास्त्र सर्व इस्राएलांना ऐकू येईल असे वाचून दाखव.

12 सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरा ह्यांना जमव, म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील, आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील;

13 त्यांच्या ज्या पुत्रपौत्रांना ही वचने माहीत नाहीत, तेही ऐकतील आणि यार्देन ओलांडून जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात जोपर्यंत तुम्ही राहाल तोपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरायला ते शिकतील.”


परमेश्वराने मोशेला दिलेल्या अखेरच्या सूचना

14 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तुझा अंतकाळ समीप आला आहे म्हणून यहोशवाला बोलाव आणि तुम्ही दोघे दर्शनमंडपात उपस्थित व्हा म्हणजे मी त्याला अधिकारसूत्रे देईन.” मग मोशे व यहोशवा दर्शनमंडपात उपस्थित झाले.

15 तेव्हा परमेश्वर त्या मंडपात मेघस्तंभाच्या ठायी प्रकट झाला; हा मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी उभा राहिला.

16 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर कालनिद्रा घेणार आहेस; मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील, व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील.

17 त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’

18 त्या वेळेस ते अन्य देवांकडे वळल्याने त्यांच्या हातून जी दुष्टाई घडेल तिच्यामुळे मी आपले मुख त्यांच्यापासून खरोखरच लपवीन.

19 आता तुम्ही हे गीत लिहून घ्या, हे इस्राएल लोकांना शिकवा; त्यांना हे तोडपाठ करायला लावा, म्हणजे ते इस्राएल लोकांविरुद्ध माझ्या वतीने साक्ष देईल;

20 कारण ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश देण्याची शपथ मी त्यांच्या पूर्वजांशी वाहिली होती, त्यात मी त्यांना नेऊन पोहचवल्यावर ते पोटभर खाऊन माजतील, आणि मग अन्य देवांकडे वळून त्यांची सेवा करतील आणि मला तुच्छ लेखून माझा करार मोडतील.

21 त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवल्यावर हे गीत त्यांच्यासमोर साक्ष देईल, कारण ते त्यांच्या संतानाच्या मुखी सदोदित राहील. ज्या देशात त्यांना घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली होती त्यात त्यांना अजून नेलेही नाही तोच त्यांच्या मनात काय काय चालले आहे हे मी जाणून आहे.”

22 मोशेने त्याच दिवशी हे गीत लिहून घेतले व इस्राएल लोकांना शिकवले.

23 मग परमेश्वराने नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला अधिकारसूत्रे देऊन म्हटले, “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश मी इस्राएल लोकांना शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुला त्यांना घेऊन जायचे आहे; मी तुझ्याबरोबर असेन.”

24 मोशेने ह्या नियमशास्त्राची वचने अथपासून इतिपर्यंत लिहून ग्रंथ पुरा केला.

25 तेव्हा त्याने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवी ह्यांना आज्ञा केली की,

26 “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराच्या कोशाच्या आत एका बाजूला ठेवा म्हणजे तो तेथे तुमच्याविरुद्ध साक्षीदार म्हणून राहील,

27 कारण तुमचा बंडखोरपणा आणि तुमच्या मानेचा ताठा मी जाणून आहे; पाहा, मी अजून तुमच्याबरोबर जिवंत असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करीत आला आहात, तर मी मेल्यावर कितीतरी कराल!

28 आपल्या वंशांचे सर्व वडील आणि अंमलदार ह्यांना माझ्यासमोर जमवा म्हणजे मी त्यांच्याविरुद्ध आकाश व पृथ्वी ह्यांना साक्षी ठेवून त्यांच्या कानावर ही वचने घालीन.

29 कारण मला ठाऊक आहे की, मी मेल्यावर तुम्ही अगदी बिघडून जाल; ज्या मार्गाने चालण्याची मी तुम्हांला आज्ञा केली आहे तो तुम्ही सोडून द्याल; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते तुम्ही कराल व आपल्या हातच्या कृतीने त्याला चीड आणाल म्हणून पुढील काळी तुमच्यावर विपत्ती येऊन पडेल.”


मोशेचे गीत

30 मग मोशेने इस्राएलाच्या सर्व मंडळीला ह्या गीताचे शब्द अथपासून इतिपर्यंत ऐकवले :

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan