Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

अनुवाद 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


रानात कंठलेली वर्षे

1 मग परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच केले आणि पुष्कळ दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो.

2 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला,

3 ‘तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिला आहात, आता उत्तरेकडे वळा;

4 आणि लोकांना आज्ञा कर की, सेईरचे रहिवासी तुमचे भाऊबंद जे एसावाचे वंशज त्यांच्या हद्दीतून तुम्हांला जायचे आहे; त्यांना तुमची भीती वाटेल म्हणून फार सांभाळा.

5 त्यांच्याशी झगडू नका, कारण त्यांच्या देशातली तसूभरही जमीन मी तुम्हांला देणार नाही; कारण सेईर डोंगर एसावाला वतन म्हणून मी दिला आहे.

6 पैसे देऊन त्यांच्याकडून अन्न विकत घेऊन खा आणि पैसे देऊन त्यांच्याकडून पाणीही विकत घेऊन प्या.

7 कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे; ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे; आज ही चाळीस वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे; तुला कशाचीही वाण पडली नाही.’

8 म्हणून सेईरचे रहिवासी आपले भाऊबंद जे एसावाचे वंशज ह्यांना चुकवून आपण अराबाच्या मार्गाने एलाथ व एसयोन-गेबर ही मागे टाकून पुढे गेलो. मग आपण वळून मवाबातील रानाकडल्या मार्गाने गेलो.

9 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव देऊ नकोस व त्यांच्याशी युद्धाचा प्रसंग आणू नकोस; मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग तुला वतन म्हणून देणार नाही, कारण मी लोटाच्या वंशजांना आर नगर वतन म्हणून दिले आहे.’

10 (पूर्वी तेथे एमी लोक राहत होते; ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते;

11 अनाकी लोकांप्रमाणे त्यांनाही रेफाई म्हणतात, पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.

12 तसेच पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत; पण एसावाच्या वंशजांनी त्यांचे वतन बळकावून त्यांचा संहार केला आणि त्यांच्या जागी वस्ती केली; परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशाचे इस्राएल लोकांनी जसे केले तसेच ह्यांनीही केले.)

13 ‘आता उठा, जेरेद नाल्यापलीकडे जा.’ तेव्हा आपण जेरेद नाल्यापलीकडे गेलो.

14 आपण कादेश-बर्ण्या सोडून जेरेद नाल्यापलीकडे गेलो, त्याला अडतीस वर्षे लागली; ह्या अवधीत परमेश्वराने शपथ वाहिल्याप्रमाणे त्या सबंध पिढीतल्या योद्ध्यांचा छावणीत नाश झाला.

15 त्यांचा नायनाट होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा हात त्यांच्यावर उगारलेला होता.

16 ह्या प्रकारे सर्व योद्धे मेले आणि लोकांतून त्यांचा उच्छेद झाला.

17 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला,

18 ‘आज आर येथून मवाबाची सरहद्द ओलांडून तुला पलीकडे गेले पाहिजे;

19 अम्मोनी लोकांच्या सीमेवर येशील तेव्हा त्यांना उपद्रव देऊ नकोस व त्यांच्याशी झगडा करू नकोस, अम्मोनी लोकांच्या देशाचा कोणताही भाग मी तुला वतन म्हणून देणार नाही, कारण लोटाच्या वंशजांना तो मी वतन म्हणून दिला आहे.’

20 (त्यालासुद्धा ‘रेफाईचा देश’ म्हणतात; पूर्वी तेथे रेफाई राहत असत; अम्मोनी लोक त्यांना ‘जमजुम्मी’ म्हणतात;

21 ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते; पण परमेश्वराने अमोन्यांकरवी त्यांचा संहार केला; त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली.

22 सेईर येथील एसावाच्या वंशजांकडून परमेश्वराने होरी लोकांचा संहार केला, तसाच त्याने ह्यांचाही केला; त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली, आणि आजपर्यंत ते तेथे वस्ती करून आहेत.

23 तसेच अव्वी लोक गज्जा नगरापर्यंत खेड्यापाड्यांत वस्ती करून होते; कफतोराहून आलेले कफतोरी ह्यांनी त्यांचा संहार करून त्यांच्या जागी वस्ती केली.)

24 ‘उठा, कूच करून आर्णोन खोरे ओलांडून जा; पाहा, हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे; तो देश तू आपल्या ताब्यात घ्यायला लाग आणि त्याला लढाईला प्रवृत्त कर.

25 सार्‍या नभोमंडळाखालील लोकांच्या मनात आज मी तुझ्याविषयी अशी दहशत आणि भीती उत्पन्न करू लागेन की, ते तुझे वर्तमान ऐकून थरथरा कापतील व तुला घाबरतील.’


इस्राएल लोक सीहोन राजाला जिंकतात
( गण. 21:21-30 )

26 मी कदेमोथ रानातून हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्याकडे दूतांच्या हाती सलोख्याचा निरोप पाठवला की,

27 ‘मला तुझ्या देशातून जाऊ दे; मी आपला नीट मार्गाने जाईन, उजवीडावीकडे वळणार नाही.

28 तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पैसे घेऊन मला पिण्यासाठी पाणी दे; मात्र मला तुझ्या देशातून पायी जाऊ दे;

29 सेईर येथे राहणारे एसावाचे वंशज आणि आर येथे राहणारे मवाबी हे जसे माझ्याशी वागले तसाच तूही मी यार्देनेपलीकडे जाऊन आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला दिलेल्या देशात पोहचेपर्यंत माझ्याशी वाग.’

30 पण हेशबोनाचा राजा सीहोन आम्हांला त्याच्या देशातून जाऊ देईना; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला तुमच्या हाती द्यावे म्हणून त्याची वृत्ती कठोर केली व त्याचे मन कठीण केले; आज तो देश तुमच्या हाती आहे.

31 परमेश्वर मला म्हणाला, ‘सीहोन व त्याचा देश मी तुझ्या ताब्यात देऊ लागलो आहे; त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून तो हस्तगत करायला लाग.’

32 तेव्हा सीहोन आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यासाठी निघाला आणि याहस येथे युद्ध करायला आमच्यावर चालून आला.

33 मग आपला देव परमेश्वर ह्याने त्याला आपल्या हवाली केले, आणि आपण त्याचा, त्याच्या मुलांचा व त्याच्या सर्व सेनेचा पराभव केला.

34 त्या वेळी आपण त्याची सर्व नगरे घेतली आणि प्रत्येक नगराचा, त्यांतील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला; आपण त्यांतला कोणीही शिल्लक ठेवला नाही;

35 मात्र जिंकलेल्या नगरातल्या लुटीबरोबर त्यांतील जनावरेही आपण लुटून नेली.

36 आर्णोन खोर्‍याच्या कडेला अरोएर नगर आहे तेथून व खोर्‍यात जे नगर आहे तेथून गिलादापर्यंत आम्हांला दुर्गम असे एकही नगर राहिले नाही; आपला देव परमेश्वर ह्याने ती सर्व आपल्या स्वाधीन करून दिली;

37 मात्र अम्मोनी वंशजांच्या देशात, यब्बोक नदीच्या काठावरील सर्व प्रदेशात, डोंगरवटीतील नगरांत आणि आमचा देव परमेश्वर ह्याने ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे आपल्याला मना केले होते त्या त्या ठिकाणी तुम्ही गेला नाहीत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan