अनुवाद 11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)परमेश्वराची महती 1 म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावीस आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात. 2 आज तुम्ही हे लक्षात आणा; तुमच्या मुलाबाळांना मी हे सांगत नाही; त्यांनी तर हे काही अनुभवले नाही; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेली शिक्षा, त्याचा महिमा, पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या द्वारे 3 मिसर देशामध्ये त्याने मिसर देशाचा राजा फारो ह्याला व त्याच्या सर्व देशाला काय काय चिन्हे व कृत्ये दाखवली, 4 त्याने मिसरी सैन्याचे घोडे व रथ ह्यांचे काय केले, म्हणजे ते तुमचा पाठलाग करीत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला व त्यांचा नाश करून त्यांचा मागमूस आजपर्यंत कसा उरू दिला नाही; 5 आणि तुम्ही ह्या ठिकाणी येईपर्यंत त्याने तुमचे रानात काय काय केले; 6 त्याचप्रमाणे त्याने रऊबेनी अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांचे काय केले, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांची कुटुंबे, डेरे आणि त्यांचे अनुचर ह्यांसह त्यांना इस्राएल लोकांदेखत कसे गिळून टाकले, ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नाहीत; 7 पण तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत. वचनदत्त देशामुळे प्राप्त होणारे आशीर्वाद 8 म्हणून जी आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी, म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल; 9 आणि जो देश परमेश्वराने शपथपूर्वक वचनाद्वारे तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या संतानाला देऊ केला होता व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्यात तुम्ही चिरकाळ राहाल. 10 तू जो देश वतन करून घ्यायला जात आहेस तो तुम्ही सोडून आलेल्या मिसर देशासारखा नाही; तेथे तू भाजीच्या मळ्यांप्रमाणे बी पेरून पायांनी जमिनीला पाणी देत होतास; 11 पण जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतीरी जात आहात तो डोंगरखोर्यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो; 12 तुमचा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो, वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याची नजर त्या देशावर सदैव असते. 13 मी ज्या आज्ञा आज तुम्हांला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने त्याची सेवा करीत राहाल, 14 तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन; म्हणजे तुला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करता येईल. 15 मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खायला मिळेल. 16 तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल. 17 तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील, म्हणजे पाऊस पडणार नाही; भूमी आपला उपज देणार नाही; आणि जो उत्तम देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल. 18 म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हांदाखल आपल्या हातांना बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. 19 तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. 20 ती आपल्या दारांच्या चौकटीवर आणि फाटकांवर लिहा. 21 म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यात तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील. 22 ही जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याच्या सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल, 23 तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल आणि तुमच्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुम्ही आपल्या ताब्यात घ्याल. 24 जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल. 25 तुमच्याशी कोणी सामना करणार नाही; ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करील. 26 पाहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवत आहे, 27 म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे त्या तुम्ही पाळल्या तर तुम्हांला आशीर्वाद मिळेल; 28 पण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हांला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांच्या मागे तुम्ही गेलात तर तुम्हांला शाप मिळेल. 29 जो देश ताब्यात घ्यायला तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेऊन पोहचवील तेव्हा तू गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावास. 30 हे डोंगर यार्देनेपलीकडे सूर्य मावळतो त्या दिशेला अराबात राहणारे कनानी ह्यांच्या प्रदेशात गिलगालासमोर, मोरे येथील एलोन वृक्षाच्या जवळ आहेत ना? 31 जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात; तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल. 32 तेव्हा जे विधी व नियम मी आज तुम्हांला देत आहे ते सर्व काळजीपूर्वक पाळा. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India