दानीएल 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)दानिएलास पडलेले चार श्वापदांचे स्वप्न 1 बाबेलचा राजा बेलशस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टान्त घोळू लागले; मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले. 2 दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्ही दिशांचे वारे महासागरावर सुटले; 3 आणि भिन्नभिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली. 4 पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले. 5 मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते; ते एक अंग वर करून उभे राहिले, त्याने आपल्या तोंडात, आपल्या दातांमध्ये तीन फासोळ्या धरल्या होत्या; लोक त्याला म्हणाले, “ऊठ, पुष्कळ मांस खा.” 6 ह्यानंतर मी पाहिले तर आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले; त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते; त्या श्वापदाला चार शिरेही होती; त्याला अधिकार दिला होता. 7 ह्यानंतर मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते; त्याला मोठाले लोखंडी दात होते; ते सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी; ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते; आणि त्याला दहा शिंगे होती. 8 मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. 9 मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. 10 त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या. 11 त्या वेळी त्या शिंगांतून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला; त्याचे शरीर छिन्नभिन्न करण्यात आले; व ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले; एवढे मी पाहिले. 12 इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला; तरी काही मुदतीपर्यंत काही काळपावेतो त्यांचा प्राण वाचवण्यात आला. 13 तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. 14 सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे. 15 मग मी दानीएल तर असा झालो की, माझ्या ठायी माझा जीव घाबरा झाला; माझ्या डोक्यात घोळणार्या दृष्टान्तांमुळे मी चिंताक्रांत झालो. 16 जवळ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो व ह्या सर्व गोष्टींचे मर्म त्याला विचारले. तेव्हा त्याने मला ते कथन केले व ह्या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला. 17 ‘ती मोठाली चार श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे होत. 18 तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.’ 19 मग ते चौथे श्वापद, जे इतरांहून भिन्न असून अतिविक्राळ होते, ज्याचे दात लोखंडाचे व नखे पितळेची होती, जे सर्वकाही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायांखाली तुडवी, त्याचे काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. 20 त्याच्या डोक्याला दहा शिंगे असून आणखी एक शिंग निघाले त्यामुळे तीन शिंगे उपटून पडली; ह्या शिंगाला डोळे व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्याबरोबरच्या इतर शिंगांहून लठ्ठ दिसत होते; ह्या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. 21 मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले, व त्याचे त्यांच्यावर प्राबल्य झाले. 22 शेवटी पुराणपुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या पवित्र जनांना न्याय मिळाला आणि त्या पवित्र जनांना राज्याचे स्वामित्व मिळण्याचा समय आला; ह्याचेही मर्म कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. 23 त्याने सांगितले की, ‘चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल; ते इतर राज्यांहून भिन्न होईल; ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, तिचे तुडवून चूर्ण करील. 24 आता दहा शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून दहा राजे निघतील व त्यानंतर आणखी एक राजा निघेल; तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजांना पादाक्रांत करील. 25 तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील. 26 पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील. 27 राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन ह्यांना देण्यात येतील; त्याचे राज्य सनातन आहे, सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्याचे अंकित होतील.” 28 ह्या गोष्टींचे कथन येथे संपले. मी दानीएल ह्या कल्पनांनी व्याकूळ झालो, आणि माझी चर्या पालटली; तरी मी हे सर्व आपल्या मनात ठेवले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India