Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

दानीएल 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सिंहाच्या गुहेत दानीएल

1 दारयावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले;

2 त्यांच्यावर तीन अध्यक्ष नेमले, दानीएल त्यांपैकी एक होता; राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांता-धिकार्‍यांनी आपला हिशोब त्या तिघांना द्यावा असे ठरवले.

3 दानीएल त्या अध्यक्षांत व प्रांताधिकार्‍यांत श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठायी उत्तम आत्मा वसत होता; त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता.

4 असे असता राज्यकारभारासंबंधाने दानिएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकार्‍यांनी चालवला; पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना; कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही.

5 तेव्हा ती माणसे म्हणाली, “ह्या दानिएलाविरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही; मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्याविरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल.”

6 मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, “दारयावेश महाराज, चिरायू असा.

7 राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार ह्यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी, व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की, हे राजा, ‘तीस दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.’

8 तर महाराज, ही द्वाही मंजूर करा. फर्मानावर सही करा म्हणजे मेदी व पारसी ह्यांच्या कधी न पालटणार्‍या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटायचा नाही.”

9 तेव्हा दारयावेश राजाने फर्मानावर व द्वाहीवर सही केली.

10 ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.

11 त्या वेळी ती माणसे जमावाने आली तेव्हा दानीएल आपल्या देवाची प्रार्थना व विनंती करत आहे असे त्यांना आढळून आले.

12 तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरवलेल्या द्वाहीविषयी त्याला म्हणाले, “महाराज, तीस दिवसपर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरवली ना?” राजाने उत्तर दिले की, “मेदी व पारसी ह्यांच्या न पालटणार्‍या कायद्याप्रमाणे हे निश्‍चित ठरवले आहे.”

13 तेव्हा ते राजाला म्हणाले, “महाराज, पकडून आणलेल्या यहूद्यांपैकी तो दानीएल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही; तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो.”

14 हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला, आणि दानिएलाचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला; त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला.

15 मग ती सर्व माणसे राजाकडे जमावाने आली व त्याला म्हणाली, “हे राजा हे लक्षात आण : मेदी व पारसी ह्यांचा असा शिरस्ता आहे की राजाने केलेल्या द्वाह्या किंवा नियम पालटता येत नाहीत.”

16 त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, “ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील.”

17 त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली; आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला; तो अशासाठी की दानिएलाच्या बाबतीत काहीएक फेरबदल होऊ नये.

18 नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली; त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत; त्याची झोप उडाली.

19 मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला.

20 तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?”

21 दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा.

22 माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”

23 तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता.

24 तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.

25 मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना, दारयावेश राजाने असे लिहून कळवले की, “तुमचे कल्याण असो!”

26 मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.

27 ज्याने दानिएलास सिंहांच्या पंजांतून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे; तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे.”

28 हा दानीएल दारयावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी ह्याच्या कारकिर्दीत उत्कर्षास पोहचला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan