दानीएल 12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)अंतसमय 1 “त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल; कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील. 2 भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. 3 जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्यांप्रमाणे चमकतील. 4 हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल. 5 मग मी दानिएलाने पाहिले तेव्हा दुसरे दोन पुरुष, एक नदीच्या ह्या तीरास व दुसरा त्या तीरास असे उभे होते. 6 तेव्हा तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता, त्याला त्यांतल्या एकाने विचारले, “ह्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती अवधी आहे?” 7 तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.” 8 मी हे ऐकले, पण समजलो नाही; तेव्हा मी म्हणालो, “हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय?” 9 तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत. 10 पुष्कळ लोक आपणांस शुद्ध व शुभ्र करतील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करतील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल. 11 नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल, तेव्हापासून एक हजार दोनशे नव्वद दिवस लोटतील. 12 जो धीर धरून तेराशे पस्तीस दिवसांची अखेर पाहील तो धन्य. 13 तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India