Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

दानीएल 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


दानिएलाचे शिक्षण व त्याचे सोबती

1 यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला.

2 प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला त्याच्या हाती दिले; त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली; त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली.

3 राजाने आपल्या खोजांचा नायक अश्पनज ह्याला आज्ञा केली की इस्राएली राजकुलापैकी व सरदार घराण्यांपैकी

4 अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारांत दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या व भाषा शिकवावी.

5 राजा खात असे त्या मिष्टान्नांतून व पीत असे त्या द्राक्षारसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून तीन वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे; ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे, अशी राजाने आज्ञा केली.

6 ह्या तरुण मंडळीत यहूदा वंशातले दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्‍या हे होते.

7 खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्‍यास अबेद्नगो.

8 राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्‍चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा.

9 खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले.

10 खोजांचा सरदार दानिएलास म्हणाला, “माझा स्वामीराजा ह्याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे; त्याचा मला धाक आहे; तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावीत? राजापुढे माझे डोके उडवले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा?”

11 तेव्हा खोजांच्या सरदाराने दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजर्‍या ह्यांच्यावर जो कारभारी नेमला होता त्याला दानिएलाने म्हटले,

12 “दहा दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पाहा, आम्हांला खायला शाकान्न व प्यायला पाणी मात्र दे.

13 नंतर आमची तोंडे पाहा; आणि राजघरचे अन्न खाणार्‍या तरुणांचीही तोंडे पाहा; मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या ह्या दासांचे कर.”

14 त्याने त्यांची ही विनंती ऐकून दहा दिवस त्यांच्यावर हा प्रयोग केला.

15 दहा दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणार्‍या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले.

16 तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यांना शाकान्न देऊ लागला.

17 ह्या चौघां तरुणांना देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यांत निपुण व प्रवीण केले; दानीएल हा सर्व दृष्टान्त व स्वप्ने ह्यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला.

18 नबुखद्नेस्सर राजाने त्यांना आपल्यासमोर हजर करण्याची मुदत ठरवली होती ती संपल्यावर खोजांच्या सरदाराने त्याच्यासमोर त्यांना हजर केले.

19 तेव्हा राजाने त्यांच्याशी संभाषण केले; त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्‍या ह्यांच्या तोडीचे दुसरे कोणी दिसून आले नाहीत; म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले.

20 ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई.

21 दानीएल हा कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan