Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

कलस्सै 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम

1 म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा.

2 वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.

3 कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.

4 आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल2 तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.3

5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा;

6 त्यामुळे आज्ञा मोडणार्‍या मुलांवर देवाचा कोप होतो.

7 तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता.

8 परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणांपासून दूर करा.

9 एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे;

10 आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.

11 ह्यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वांत आहे.

12 तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा;

13 एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा;

14 पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा.

15 ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणांत राज्य करो; तिच्याकरता तुम्हांला एकशरीर असे पाचारण्यात आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.

16 ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा;

17 आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.


ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन

18 स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.

19 पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.

20 मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक1 आहे.

21 बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.

22 दासांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा, माणसांना संतोषवणार्‍या नोकरांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.

23 आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.

24 प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा.

25 कारण अन्याय करणार्‍याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल; पक्षपात होत नाही.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan