Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

कलस्सै 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


नमस्कार

1 कलस्सै येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणार्‍या बंधूंना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :

2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


उपकारस्मरण व प्रार्थना

3-4 ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती, ह्यांविषयी ऐकून, आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो.

5 ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकले.

6 ही सुवार्ता तुमच्याकडे येऊन पोहचली आहे; तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली, त्या दिवसापासून जशी तुमच्यामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत व वृद्धिंगत होत चालली आहे.

7 एपफ्रास, आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्याकरता ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकलात.

8 आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हांला कळवले.

9 ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्या द्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे;

10 अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्या-करता2 त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी.

11 सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे;

12 आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी.

13 त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.

14 त्या पुत्राच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.


प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य

15 तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे;

16 कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्वकाही त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे;

17 तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.

18 तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे; तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे.

19 कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी,

20 आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्या द्वारे जे सर्वकाही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्या द्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले.

21 जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता,

22 त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे.

23 जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता, आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाहीत तर हे होईल.


ख्रिस्ती मंडळीच्या वाढीसाठी पौल ख्रिस्ताचा सहकारी

24 तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे;

25 देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो.

26 जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय.

27 ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे.

28 आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो; अशासाठी की, प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे.

29 ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan