Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

आमोस 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराच्या न्यायापासून सुटका अशक्य

1 मी प्रभूला वेदीजवळ उभे राहिलेले पाहिले; तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यांवर प्रहार कर म्हणजे उंबरठे हलतील; त्यांचे तुकडे करून त्या सर्वांच्या डोक्यावर पाड; त्यांच्यातले शेष उरतील ते मी तलवारीने वधीन; त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यांतला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही.

2 ते अधोलोक फोडून आत उतरले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढील; ते वर स्वर्गात चढले, तरी तेथून मी त्यांना खाली ओढून आणीन.

3 ते कर्मेलाच्या माथ्यावर लपून राहिले, तरी मी त्यांचा सुगावा लावीन व तेथून त्यांना ओढून आणीन; ते समुद्राच्या तळी माझ्या दृष्टिआड लपून राहिले, तरी मी तेथे सर्पाला आज्ञा करीन म्हणजे तो त्यांना डसेल.

4 आणि ते शत्रूंपुढे पाडाव होऊन गेले असले, तरी तेथे मी तलवारीला आज्ञा करीन म्हणजे ती त्यांना वधील; मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, ती त्यांच्या वाइटासाठी असेल, बर्‍यासाठी नव्हे.”

5 कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, ह्याने भूमीला हात लावताच ती विरघळते आणि तिच्यावरील सर्व रहिवासी शोक करतात; तिला नील नदीप्रमाणे पूर येईल; मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती पुन्हा ओसरेल.

6 तो आकाशात आपल्या मंदिराचे मजले उभारतो, पृथ्वीवर त्याने आपला नभोमंडप स्थापला आहे, तो समुद्राच्या पाण्यास बोलावून ते पृथ्वीच्या पाठीवर ओततो; त्याचे नाम परमेश्वर आहे.

7 “इस्राएलाच्या संतानांनो, तुम्ही मला कूशाच्या वंशजांसारखे नाहीत काय?” असे परमेश्वर म्हणतो. मी इस्राएल लोकांना मिसर देशातून, पलिष्टी लोकांना कफतोरांतून आणि अरामी लोकांना कीरातून आणले नाही काय?

8 पाहा, प्रभू परमेश्वराचा डोळा ह्या पापिष्ट राज्यावर आहे; मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन; याकोबाचे घराणे मात्र मी समूळ नष्ट करणार नाही,” असे परमेश्वर म्हणतो.

9 “कारण पाहा, धान्य चाळणीने चाळतात आणि एक लहानसा दाणाही जमिनीवर पडत नाही, तसे मी आज्ञा करून इस्राएलाच्या घराण्यास सर्व राष्ट्रांतून चाळून घेईन.

10 माझ्या लोकांतले जे सर्व पापी जन, ‘आम्हांला अनिष्ट गाठणार नाही, ते आमच्यावर येणार नाही,’ असे म्हणतात ते तलवारीने मरतील.


इस्राएलाचा भावी उद्धार

11 दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन;

12 मग ते अदोमाच्या अवशेषाचा व ज्यांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील,” असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो.

13 पाहा, परमेश्वर म्हणतो “असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणार्‍याला गाठील व द्राक्षे तुडवणारा बी पेरणार्‍याला गाठील; डोंगरांवरून नवा द्राक्षारस वाहील व सर्व टेकड्यांना पाझर फुटतील.

14 मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.

15 मी त्यांना त्यांच्या भूमीत रुजवीन व जी भूमी मी त्यांना दिली आहे तिच्यातून त्यांना ह्यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही,” असे परमेश्वर तुझा देव म्हणतो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan