आमोस 8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)चौथा दृष्टान्त : पक्व फळांची पाटी 1 प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, मला पक्व फळांची पाटी दिसली. 2 तो म्हणाला, आमोसा, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “पक्व फळांची पाटी.” मग परमेश्वर म्हणाला, “माझे लोक इस्राएल ह्यांचा अंतसमय आला आहे; ह्यापुढे मी त्यांची गय करणार नाही.” 3 प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी मंदिरांतील गीते आक्रंदनाची होतील, प्रेतांच्या राशी पडतील; सर्व ठिकाणी ती मुकाट्याने बाहेर फेकतील. दाराशी आलेला इस्राएलाचा र्हास 4 जे तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी आ पसरता व देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका : 5 तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल? म्हणजे आम्हांला धान्य विकता येईल; शब्बाथ केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू; 6 म्हणजे आम्ही रुपे देऊन दीनांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरिबांना विकत घेऊ व गव्हाचे भूस विकून टाकू.” 7 परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की, “मी त्यांची कोणतीही कर्मे खातरीने कधीही विसरणार नाही. 8 ह्यामुळे भूमीचा थरकाप होणार नाही काय? तिच्यावर प्रत्येक रहिवासी शोक करणार नाही काय? तिला नील नदीप्रमाणे पूर्णपणे पूर येईल. मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती खळबळेल व पुन्हा ती ओसरेल.” 9 प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन. 10 तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.” 11 प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल. 12 ते ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडतझडत जातील; ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील तरी त्यांना ते प्राप्त व्हायचे नाही. 13 त्या समयी सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्च्छित होतील. 14 जे शोमरोन येथील मूर्तीची शपथ घेऊन म्हणतात की, ‘हे दाना, तुझ्या देवाच्या जीविताची शपथ, बैर-शेब्याच्या यात्रेची शपथ,’ ते पडतील; पुन्हा उठायचे नाहीत.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India