Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

आमोस 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


विनाशाचे तीन दृष्टान्त : टोळ, अग्नी व ओळंबा

1 प्रभू परमेश्वराने मला दाखवले : तेव्हा पाहा, पडसाळ उगवण्याच्या सुमारास त्याने टोळ उत्पन्न केले; आणि पाहा, राजाकरता कापणी झाल्यावर उगवलेले ते गवत होते.

2 आणि असे झाले की त्यांनी देशातील झाडपाला खाऊन फस्त केला तेव्हा मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो, क्षमा कर, याकोबाचा कसा टिकाव लागेल? कारण तो दुर्बळ आहे.”

3 तेव्हा परमेश्वराला ह्याबद्दल अनुताप झाला व तो म्हणाला, “असे घडायचे नाही.”

4 प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलावले, तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकला व भूमीही तो खाऊन टाकणार होता.

5 तेव्हा मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो की हे थांबव; याकोबाचा कसा टिकाव लागेल, कारण तो दुर्बळ आहे!”

6 तेव्हा परमेश्वराला ह्याबद्दल अनुताप झाला; प्रभू परमेश्वर म्हणाला, “हेही घडायचे नाही.”

7 त्याने मला दाखवले तेव्हा पाहा, ओळंबा लावून बांधलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे, त्याच्या हातात ओळंबा आहे.

8 परमेश्वर मला म्हणाला, “आमोसा, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “ओळंबा.” प्रभू म्हणाला, “पाहा, माझे लोक इस्राएल ह्यांच्यामध्ये मी ओळंबा धरतो; मी ह्यापुढे त्यांची गय करणार नाही;

9 इसहाकाची उच्च स्थाने ओसाड होतील, इस्राएलाच्या पवित्र स्थानांची नासधूस होईल, आणि मी तलवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन.”


आमोस व अमस्या

10 मग बेथेल येथील याजक अमस्या ह्याने इस्राएलाचा राजा यराबाम ह्याला निरोप पाठवला की, “इस्राएल घराण्याच्या भरवस्तीत आमोसाने फितुरी केली आहे, त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाहीत.

11 कारण आमोस म्हणतो, ‘यराबाम तलवारीने मरेल, व इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने पकडून नेतील.”’

12 मग अमस्या आमोसाला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहूदा देशात पळून जा; तेथे संदेश सांगून पोट भर;

13 पण बेथेलात ह्यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्रस्थान, ही राजधानी आहे.”

14 तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उंबरांच्या झाडांची निगा राखणारा आहे.

15 मी कळपांमागे असता परमेश्वराने मला निवडले; परमेश्वर मला म्हणाला, ‘जा, माझे लोक इस्राएल ह्यांना संदेश सांग.’

16 तर परमेश्वराचे वचन ऐक; तू म्हणतोस ‘इस्राएलाविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस.”’

17 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan