Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

आमोस 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


इस्राएलाचा नाश

1 “सीयोनेत सुखवस्तू असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निश्‍चिंत असणारे ह्यांना धिक्कार असो! प्रधान राष्ट्रांतल्या ज्या प्रमुखांकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्याला धिक्कार असो!

2 पलीकडे कालनेला जाऊन पाहा, व तेथून महान हमाथाला जा, पलिष्ट्यांच्या गथाला जा, ह्या राज्यांपेक्षा ती श्रेष्ठ आहेत काय? त्यांचा मुलूख तुमच्या मुलखापेक्षा मोठा आहे काय?

3 अहो तुम्ही विपत्तीच्या दिवसाचा विचार लांबणीवर टाकता आणि बलात्काराचे आसन जवळ आणता.

4 तुम्ही हस्तिदंती पलंगावर निजता व मंचकावर ताणून पडता; कळपातली कोकरे व गोठ्यातली वासरे खाता.

5 तुम्ही वीणेच्या सुरावर काहीतरी गात असता; दाविदाप्रमाणे अनेक तंतुवाद्ये बनवता.

6 तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षारस पिता, उत्तम तेलांनी आपणांस माखता, योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही.

7 ह्यास्तव ते आता बंदिवानांच्या अग्रभागी चालून बंदिवासात जातील; ख्यालीखुशाली करणार्‍यांचा गोंगाट नाहीसा होईल.”

8 प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली; परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करतो, त्याच्या महालांचा मी तिटकारा करतो, हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन.”

9 मग असे होईल की एका घरात दहा माणसे असली तरी ती मरतील.

10 एखाद्याचा नातलग त्याला उचलण्यासाठी आणि त्याला जाळण्यासाठी त्याची हाडे घरातून बाहेर नेण्यास येईल, तेव्हा तो घरातल्या अंतर्भागी असणार्‍याला विचारील की, “आणखी कोण तुझ्याबरोबर आहे काय?” तो म्हणेल, “नाही”; तेव्हा हा म्हणेल, “गप्प राहा! परमेश्वराचा नामोच्चार करायचा नाही.”

11 कारण पाहा, परमेश्वर आज्ञा करील तेव्हा मोठ्या घरांना भगदाडे पाडण्यात येतील आणि लहान घरांना भेगा पाडण्यात येतील.

12 घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरतात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व नीतिमत्तेच्या फळाऐवजी कडूदवणा केला आहे.

13 तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल हर्ष करता; तुम्ही म्हणता, “आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादली नाही काय?”

14 परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “पाहा, हे इस्राएलाच्या घराण्या, मी तुमच्यावर एक राष्ट्र उठवीन; ते हमाथाच्या सीमेपासून अराबाच्या ओहोळापर्यंत तुम्हांला पिडतील.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan