प्रेषित 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)सात जणांची निवड 1 त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. 2 तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. 3 तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू; 4 म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.” 5 ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली. 6 त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. 7 मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली. स्तेफनावर हल्ला 8 स्तेफन कृपा1 व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे. 9 तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर, आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया ह्यांतील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वितंडवाद घालू लागले. 10 पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना. 11 तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, “आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले” असे म्हणण्यास पढवले. 12 आणि लोकांना, वडिलांना व शास्त्र्यांना चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यासभेपुढे नेले; 13 आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले; ते म्हणाले, “हा माणूस ह्या पवित्रस्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही; 14 कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.” 15 तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India