Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रेषित 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


लंगड्या भिकार्‍याला बरे करणे

1 पेत्र व योहान हे तिसर्‍या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते.

2 तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता; त्याला मंदिरात जाणार्‍यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत.

3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली.

4 तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले; आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.”

5 तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.

6 मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”

7 आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले.

8 तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.

9 सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले,

10 आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्‍चर्य व विस्मय वाटला.


पेत्राचे शलमोनाच्या देवडीवरील भाषण

11 मग तो बरा झालेला पांगळा पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्‍चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले.

12 हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, ह्याचे आश्‍चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता?

13 अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला ‘सेवक’ येशू, ह्याचा गौरव केला आहे; त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्‍चय केला असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले.

14 जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले, आणि ‘खुनी पुरुष आम्हांला द्या’ अशी मागणी केली.

15 आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले; पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्याचे आम्ही साक्षी आहोत.

16 त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्या द्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीरसंपत्ती प्राप्त झाली आहे.

17 बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकार्‍यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे.

18 परंतु देवाने, आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले.

19 तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत;

20 आणि तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे.

21 सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.

22 मोशेनेही म्हटलेच आहे, ‘प्रभू देव तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील; तो जे काही तुम्हांला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीत त्याचे ऐका.

23 आणि असे होईल की, जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल.’

24 आणखी शमुवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी सांगितले.

25 तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात.

26 देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan