प्रेषित 25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)फेस्तासमोर पौलाची चौकशी 1 मग फेस्त सुभ्यात आल्यावर तीन दिवसांनी कैसरीयाहून वर यरुशलेमेस गेला. 2 तेव्हा प्रमुख याजक व यहूद्यांतील मुख्य पुरुष ह्यांनी त्याच्याकडे पौलाविरुद्ध फिर्याद नेली; 3 आणि, मेहेरबानी करून त्याला यरुशलेमेत बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. 4 फेस्ताने उत्तर दिले, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे; 5 म्हणून त्या माणसाचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.” 6 मग तो त्यांच्यामध्ये आठ-दहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला; आणि दुसर्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला. 7 तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. 8 पौलाने प्रत्युत्तर केले की, “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.” 9 तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, “यरुशलेमेस जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?” 10 तेव्हा पौलाने म्हटले, “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता. 11 मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.” 12 तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.” अग्रिप्पा व बर्णीका 13 मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली. 14 तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. 15 मी यरुशलेमेस गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्याविरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. 16 त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. 17 म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसर्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणण्याचा हुकूम केला. 18 वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्यांबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही; 19 केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता. 20 तेव्हा ह्याची चौकशी कशी करावी हे मला सुचेना म्हणून मी त्याला विचारले, ‘यरुशलेमेस जाऊन तेथे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?’ 21 तेव्हा ‘बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे’ अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ‘ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”’ 22 अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे,” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकायला मिळेल.” 23 दुसर्या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. 24 तेव्हा फेस्त म्हणाला, “अग्रिप्पा राजे व आमच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना? ‘ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये’ असे ओरडत यहूद्यांच्या सर्व समुदायाने यरुशलेमेस व येथेही मला अर्ज केला. 25 परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही असे मला कळून आले, आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठवण्याचे मी ठरवले. 26 ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्चित असे लिहिण्यासारखे काही नाही, तुमच्यापुढे व विशेषेकरून अग्रिप्पा राजे, आपणापुढे ह्याला आणले आहे; अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहिण्यास सापडेल. 27 कारण बंदिवानास पाठवताना त्याच्यावरील दोषारोप न कळवणे मला ठीक दिसत नाही.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India