Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

2 तीमथ्य 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सुयुद्ध केल्यावर मिळणारा मुकुट

1 देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,

2 वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.

3 कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील,

4 आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.

5 तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर.

6 कारण आता माझे अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे.

7 जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे;

8 आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल.


संदेश व सलाम

9 तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये.

10 कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला.

11 लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे.

12 तुखिकाला मी इफिसास पाठवले आहे.

13 माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये; आणि पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण.

14 आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले; त्याची ‘फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील.’

15 त्याच्याविषयी तूही जपून राहा, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता.

16 माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते; ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो.

17 तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.

18 प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

19 प्रिस्का, अक्‍विला व अनेसिफराच्या घरची माणसे ह्यांना सलाम सांग.

20 एरास्त करिंथात राहिला; त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो.

21 होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. यूबूल व पुदेस, लीन व क्लौदिया व सर्व बंधू तुला सलाम सांगतात.

22 प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्याबरोबर कृपा असो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan