Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

2 थेस्सल 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शेवटचा सद्बोध व पत्राची समाप्ती

1 बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा की, तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचा गौरव व्हावा.

2 आणि हेकेखोर व दुष्ट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.

3 प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हांला स्थिर करील, व त्या दुष्टापासून राखील.

4 तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला जे सांगतो ते तुम्ही करत असता व पुढेही करत जाल.

5 प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.

6 बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणार्‍या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या संप्रदायांप्रमाणे न चालणार्‍या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे.

7 आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुमच्यामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही;

8 आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.

9 तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले.

10 कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हादेखील आम्ही तुम्हांला अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.

11 तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे ऐकतो.

12 अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वत:चेच अन्न खावे.

13 तुम्ही तर बंधूंनो, बरे करताना खचू नका.

14 ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका.

15 तरी त्याला शत्रू समजू नका, तर त्याला बंधू समजून त्याची कानउघाडणी करा.

16 शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हांला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.

17 मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम; ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.

18 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan