२ शमुवेल 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मफीबोशेथावर दावीद कृपा करतो 1 “योनाथानाप्रीत्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय?” अशी चौकशी दाविदाने केली. 2 शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता, त्याला दाविदाकडे बोलावून आणण्यात आले; राजाने त्याला विचारले, “तू सीबा आहेस काय?” त्याने म्हटले, “मीच तो आपला दास.” 3 राजाने विचारले, “ज्याच्यावर देवाप्रीत्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय?” सीबा राजाला म्हणाला, “योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे.” 4 राजाने त्याला विचारले, “तो कोठे आहे?” सीबाने राजाला म्हटले, “तो लो-दबार येथे माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरी असतो.” 5 तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्याला लो-दबाराहून माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरून बोलावून आणले. 6 मफीबोशेथ बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मफीबोशेथा!” तो म्हणाला, “आपला दास हजर आहे.” 7 दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, तुझा बाप योनाथान ह्याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन; तुझा बाप शौल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन; आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस.” 8 तो प्रणाम करून म्हणाला, “आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?” 9 मग राजाने शौलाचा सेवक सीबा ह्याला बोलावून सांगितले, “जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या पुत्राला देतो. 10 तर तू आपले पुत्र व चाकर ह्यांच्यासह त्याच्या जमिनीची लागवड कर; तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणत जा; पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेथ माझ्या पंक्तीला नित्य भोजन करील.” सीबाचे पंधरा पुत्र व वीस चाकर होते. 11 सीबा राजाला म्हणाला, “माझे स्वामीराजे ह्यांनी आपल्या दासाला केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही आपला दास करील.” ह्याप्रमाणे मफीबोशेथ इतर राजपुत्रांप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे. 12 मफीबोशेथास मीखा नावाचा एक लहान पुत्र होता. सीबाच्या घरी राहणारे सर्व जण मफीबोशेथाचे चाकर होते. 13 मफीबोशेथ यरुशलेमेत राहिला; कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी लंगडा होता. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India