Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देवाचा दाविदाशी करार
( १ इति. 17:1-27 )

1 राजा आपल्या मंदिरात राहू लागला, आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला,

2 तेव्हा राजा नाथान संदेष्ट्याला म्हणाला, “पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे!”

3 नाथान राजाला म्हणाला, “तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”

4 त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे :

5 “जा, माझा सेवक दावीद ह्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय?

6 मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्‍यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे.

7 मी इस्राएल लोकांसह जिकडे जिकडे भ्रमण करीत फिरलो तिकडे तिकडे ज्या कोणा इस्राएल वंशाला इस्राएल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यांना तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय?

8 तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले,

9 जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन.

10 मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन; मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत.

11 इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापीन.

12 तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन.

13 तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.

14 मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; त्याने अधर्म केल्यास, मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करतात तशी मी त्याला शिक्षा करीन;

15 पण तुझ्यापुढून घालवून दिलेल्या शौलावरची कृपादृष्टी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही.

16 तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.”

17 ही सर्व वचने व दर्शने जशीच्या तशी नाथानाने दाविदाला कळवली.

18 मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, “हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणावेस?”

19 हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस.

20 दावीद तुझ्यापुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला ओळखतोस.

21 तू आपल्या वचनास्तव व आपल्या मनास आले म्हणून हे थोर कृत्य करून ते आपल्या सेवकाच्या निदर्शनास आणून दिले आहेस.

22 ह्यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.

23 तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता?

24 इस्राएल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केलीस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास.

25 तर आता, हे प्रभू परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्यांविषयी जे वचन तू दिलेस ते कायमचे सिद्धीस ने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कर.

26 सेनाधीश परमेश्वर इस्राएलावर सत्ताधीश आहे असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाचा निरंतर महिमा वाढवावा आणि तुझा सेवक दावीद ह्यांचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे.

27 कारण, हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्राएलाच्या देवा, तू माझे कान उघडून सांगितलेस की, मी तुझे घराणे स्थापीन; म्हणून ही विनंती तुला करायचे धैर्य तुझ्या सेवकाला झाले.

28 आता हे प्रभू परमेश्वरा, तूच देव आहेस व तुझी वचने सत्य आहेत; आणि तू आपल्या सेवकाला अशा प्रकारे बरे करण्याचे वचन दिले आहेस;

29 तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील; कारण, हे प्रभू परमेश्वरा, तूच हे म्हटले आहेस; तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभीष्ट होवो.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan