Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


ईश-बोशेथाचा वध

1 अबनेर हेब्रोन येथे मारला गेला हे शौलाच्या पुत्राने ऐकले तेव्हा त्याचे हात दुर्बल झाले व सर्व इस्राएल लोक घाबरे झाले.

2 शौलाच्या पुत्राजवळ दोन पुरुष सेनानायक होते; एकाचे नाव बाना व दुसर्‍याचे नाव रेखाब. हे बन्यामिनी वंशातला रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र. बैरोथ हे नगरही बन्यामिन्यांच्या प्रांतात मोडत आहे.

3 बैरोथकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरे म्हणून राहिले आहेत.

4 शौलाचा पुत्र योनाथान ह्याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता; इज्रेल येथून शौल व योनाथान ह्यांच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो पाच वर्षांचा होता; त्या वेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली; ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला; त्याचे नाव मफीबोशेथ असे होते.

5 दुपारी उन्हाच्या वेळी ईश-बोशेथ आराम करीत असता रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र रेखाब व बाना हे त्याच्या घरात घुसले.

6 गहू आणण्याच्या मिषाने घरात शिरून त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग रेखाब व त्याचा भाऊ बाना हे निसटून गेले.

7 ते घरात शिरले तेव्हा तो आपल्या शय्यागृहात पलंगावर निजला होता; तेथे त्यांनी त्याच्यावर प्रहार करून त्याचा वध केला व त्याचे शिर कापून घेऊन ते रातोरात अराबाच्या वाटेने गेले.

8 त्यांनी ईश-बोशेथाचे शिर हेब्रोनात दाविदाकडे आणले; ते राजाला म्हणाले, “पाहा, आपला शत्रू व आपला प्राण घेऊ पाहणारा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याचे हे शिर आहे; आज परमेश्वराने माझ्या स्वामीराजांप्रीत्यर्थ शौल व त्याचा वंश ह्यांचा सूड उगवला आहे.”

9 दाविदाने बैरोथकर रिम्मोन ह्याचे पुत्र रेखाब व त्याचा भाऊ बाना ह्यांना उत्तर दिले की, “ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचवला त्याच्या जीविताची शपथ,

10 आपण चांगले वर्तमान आणले आहे अशा समजुतीने एकाने मला शौलाच्या मरणाची बातमी दिली; तेव्हा मी सिकलाग येथे त्याला धरून वधले; बातमी आणल्याचे हे बक्षीस मी त्याला दिले.

11 तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात, त्याच्या पलंगावर वध केला आहे; त्याचा खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हांला ह्या भूतलावरून नष्ट करावे हे कितीतरी विशेष आवश्यक आहे; नाही काय?”

12 दाविदाने आपल्या तरुण लोकांना आज्ञा केल्यावरून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे हातपाय तोडून त्यांना हेब्रोनाच्या तळ्याजवळ टांगले. पण ईश-बोशेथाचे शिर नेऊन त्यांनी हेब्रोनात अबनेराच्या कबरेत पुरले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan