Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


दावीद यहूदा राष्ट्राचा राजा होतो

1 ह्यानंतर दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न विचारला की, “मी यहूदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय?” परमेश्वराने म्हटले, “जा.” दाविदाने विचारले, “कोणीकडे जाऊ?” त्याने म्हटले, “हेब्रोनास जा.”

2 मग दावीद इज्रेलीण अहीनवाम आणि नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्या आपल्या दोन्ही स्त्रियांसह तेथे गेला.

3 तसेच दाविदाबरोबर जे पुरुष होते त्या सर्वांना आपापल्या कुटुंबांसह त्याने बरोबर नेले, व ते हेब्रोनाच्या गावात जाऊन राहिले.

4 यहूदी लोकांनी तेथे जाऊन दाविदाला अभिषेक करून यहूदाच्या वंशाचा राजा नेमले. दाविदाला त्यांनी सांगितले की, “शौलाला ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश-गिलादाचे लोक होते.”

5 तेव्हा दाविदाने याबेश-गिलादच्या लोकांकडे जासूद पाठवून त्यांना सांगितले की, “तुम्ही आपला स्वामी शौल ह्याला मूठमाती दिली ही तुम्ही त्याच्यावर दया केली, ह्याबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करो.

6 आता परमेश्वर तुमच्याशी दयेने व सत्यतेने वर्तो; तुम्ही हे कृत्य केले आहे ह्या तुमच्या चांगुलपणाचा मोबदला मीही तुम्हांला देईन.

7 हिंमत धरा, शूर व्हा; तुमचा स्वामी शौल मृत्यू पावला आहे आणि यहूदाच्या घराण्याने मला अभिषेक करून आपल्यावर राजा नेमले आहे.” दावीद शौलाच्या वंशजांबरोबर लढतो

8 इकडे नेराचा पुत्र अबनेर जो शौलाचा सेनापती होता तो शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याला बरोबर घेऊन नदीपलीकडे महनाईम येथे गेला.

9 आणि त्याने गिलाद, अश्शूर्‍यांचा देश, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन वगैरे एकंदर इस्राएलावर त्याला राजा नेमले.

10 शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलावर राज्य करू लागला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता; त्याने दोन वर्षे राज्य केले, पण यहूदाचे घराणे दाविदाला धरून राहिले.

11 हेब्रोनात दाविदाने यहूदाच्या घराण्यावर राज्य केले त्याची मुदत साडेसात वर्षांची होती.

12 मग नेराचा पुत्र अबनेर आणि शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्यांचे सेवक महनाइमाहून गिबोन येथे गेले.

13 इकडे सरूवेचा पुत्र यवाब व दाविदाचे सेवक हे बाहेर पडले आणि त्या उभय सैन्यांची गिबोनाच्या तलावाजवळ गाठ पडली; तेथे एक सैन्य तलावाच्या एका बाजूला व दुसरे दुसर्‍या बाजूला उतरले.

14 तेव्हा अबनेर यवाबाला म्हणाला, “तरुण पुरुषांनी उठून आपल्यापुढे दोन हात खेळावेत.” यबावाने म्हटले, “बरे, त्यांनी उठावे.”

15 शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याचे बारा तरुण बन्यामिनी आणि दाविदाच्या लोकांतले बारा असे संख्येने सारखे पुरुष उठून पुढे सरसावले.

16 तेव्हा त्या सर्वांनी एकमेकांची मस्तके धरून आपल्या तलवारी आपल्याबरोबर झुंजणार्‍यांच्या कुशीत खुपसल्या व ते सर्व एकदम पडले; ह्यावरून त्या स्थळाचे नाव हेलकथहसूरीम (तीक्ष्ण धारेच्या सुर्‍यांचे क्षेत्र) असे पडले; हे गिबोनात आहे.

17 त्या दिवशी तुंबळ युद्ध झाले. दाविदाच्या सेवकांपुढे अबनेर व इस्राएल लोक ह्यांनी हार खाल्ली.

18 सरूवेचे तिघे पुत्र यबाव, अबीशय व असाएल तेथे होते; त्यांतला असाएल हा हरिणासारख्या चपळ पायांचा होता.

19 असाएलाने अबनेराचा पाठलाग केला; तो त्याच्या पाठीमागे लागला असता उजवीडावीकडे वळला नाही.

20 अबनेराने मागे वळून त्याच्याकडे पाहिले व विचारले, “तू असाएल काय?” तो म्हणाला, “होय, तोच मी.”

21 अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळून एखाद्या तरुणाला पकडून त्याचे कवच लुटून घे;” पण असाएल त्याचा पाठलाग करायचा सोडीना.

22 अबनेर पुन्हा असाएलाला म्हणाला, “माझा पाठलाग करण्याचे सोडून दे; तुला मारून मी जमिनीवर का पाडावे? मग तुझा भाऊ यवाब ह्याला मी आपले तोंड कसे दाखवू?”

23 तरी तो काही केल्या मागे सरेना; तेव्हा अबनेराने आपल्या भाल्याचा दांडा त्याच्या पोटात असा खुपसला की तो त्याच्या पोटात जाऊन पाठीतून निघाला; आणि तो तेथेच पडून मेला. असाएल मरून पडला त्या ठिकाणी जेवढे लोक आले तेवढे स्तब्ध उभे राहिले.

24 इकडे यवाब व अबीशय ह्यांनी अबनेराचा पाठलाग चालू ठेवला, व सूर्यास्त होता होता अम्मा नामक पहाडाजवळ ते पोहचले; हा पहाड गिबोन रानाच्या वाटेवरील गिहा नावाच्या गावासमोर आहे.

25 बन्यामिनी लोक अबनेरामागे एकवट होऊन एक फौज बनवून एका पहाडाच्या शिखरावर उभे राहिले.

26 तेव्हा अबनेर यवाबाला हाक मारून म्हणाला, “तलवारीला निरंतर भक्ष्य देत राहायचे काय? ह्याचा अंती परिणाम दुःखदायक होणार हे तुला ठाऊक नाही काय? आपल्या भाऊबंदांच्या पाठीमागे लागण्याचे सोडून द्या, अशी आज्ञा तू आपल्या लोकांना कोठवर करणार नाहीस?”

27 यवाब म्हणाला, “देवाच्या जीविताची शपथ, तू बोलला नसतास तर खात्रीने लोक सकाळी निघून गेले असते व ते आपल्या बांधवांच्या पाठीमागे लागले नसते.”

28 मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा सर्व लोक थांबले व त्यानंतर त्यांनी इस्राएलांचा पाठलाग केला नाही किंवा त्यांच्याशी लढाई केली नाही.

29 अबनेर व त्याचे लोक रातोरात अराबामधून कूच करून यार्देनेपलीकडे गेले, आणि सगळा बिथ्रोन प्रदेश पायाखाली घालून महनाइमाला पोहचले.

30 अबनेराचा पाठलाग करण्याचे सोडून परत आल्यावर यवाबाने सर्व लोक जमा केले; तेव्हा दाविदाच्या लोकांपैकी एकोणीस पुरुष व असाएल हे नाहीत असे त्याला आढळून आले.

31 तेव्हा दाविदाच्या लोकांनी बन्यामिनी व अबनेराचे लोक ह्यांना असा मार दिला की त्यांतले तीनशेसाठ पुरुष गतप्राण झाले;

32 आणि त्यांनी असाएलाला उचलून नेऊन बेथलेहेमा-तील त्याच्या पित्याच्या थडग्यात मूठमाती दिली. मग यवाब व त्याचे लोक रात्रभर कूच करून उजाडताच हेब्रोनास पोहचले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan