Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सीबा हा भेटला; खोगीर घातलेली दोन गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, खिसमिसांचे शंभर घड, अंजिराच्या शंभर ढेपा व द्राक्षारसाचा एक बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती.

2 राजाने सिबाला विचारले, “ह्याचे प्रयोजन काय?” सीबा म्हणाला, “गाढव हे राजघराण्यातल्या लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरांना खाण्यासाठी, आणि द्राक्षारस रानात थकल्या-भागलेल्यांना पिण्यासाठी आहे.”

3 राजाने पुन्हा विचारले, “तुझ्या धन्याचा पुत्र कोठे आहे?” सीबा राजाला म्हणाला, “पाहा, तो यरुशलेमेत राहिला आहे, आज इस्राएल घराणे त्याला आपल्या पित्याचे राज्य पुन्हा देईल असे त्याला वाटत आहे.”

4 राजा सीबाला म्हणाला, “मफीबोशेथाचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.” सीबाने म्हटले, “मी प्रणाम करतो; माझे स्वामीराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी असावी.”

5 दावीद राजा बहूरीम येथे पोहचला तेव्हा पाहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला; त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते; तो शिव्याशाप देत आला.

6 तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर दगड फेकू लागला; सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्याडाव्या बाजूंना होते.

7 शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, “अरे खुनी माणसा, अधमा, नीघ, चालता हो;

8 ज्या शौलाच्या जागी तू राज्य केलेस त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे, आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम ह्याच्या हाती राज्य दिले आहे; तू रक्तपात करणारा माणूस आहेस, ह्यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस,”

9 सरूवेचा पुत्र अबीशय राजाला म्हणाला, “ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीराजांना शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवतो.”

10 राजा म्हणाला, “सरूवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करायचे आहे? तो शिव्याशाप देत आहे; दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करतोस असे त्याला कोण म्हणेल?”

11 मग दाविदाने अबीशय व आपले सर्व सेवक ह्यांना सांगितले, “पाहा, प्रत्यक्ष माझा पुत्र, माझ्या पोटचा गोळा, माझा जीव घ्यायला पाहत आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे ह्यात काय नवल! त्याच्या वाटेला जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या! कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल.

12 मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहील आणि ह्या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल.”

13 दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडाच्या कडेने त्याला शिव्याशाप देत, दगड मारत व त्याच्यावर धूळ उधळत चालला.

14 राजा आपल्या बरोबरच्या लोकांसह आपल्या मुक्कामी थकून-भागून पोहचला. तेथे त्याने विसावा घेतला.

15 अबशालोम सर्व इस्राएल लोकांसह यरुशलेमेला आला व त्याच्याबरोबर अहीथोफेलही आला.

16 दाविदाचा मित्र हूशय अर्की अबशालोमाकडे गेला तेव्हा त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! चिरायू होवो!”

17 अबशालोम त्याला म्हणाला, “तुझ्या मित्रावर अशीच का तुझी प्रीती? तू आपल्या मित्राबरोबर का गेला नाहीस?”

18 हूशय अबशालोमाला म्हणाला, “नाही; परमेश्वराने आणि ह्या लोकांनी व सर्व इस्राएल लोकांनी ज्याची निवड केली त्याचा मी आहे, व त्याच्याबरोबर राहणार.

19 मी कोणाची नोकरी करणार? त्याच्या पुत्राच्या हुजुरास राहून मी सेवा करू नये काय? जशी मी तुझ्या बापाच्या हुजुरास राहून सेवा केली तशीच मी तुझ्या हुजुरास राहून करणार.”

20 मग अबशालोम अहीथोफेलास म्हणाला, “आता आपण काय करावे ह्याविषयी सल्ला दे.”

21 अहीथोफेलाने अबशालोमाला म्हटले, “ज्या उपपत्नी तुझा पिता मंदिराच्या रक्षणास ठेवून गेला आहे त्यांच्यापाशी जा; तुझ्या बापाला तुझा वीट आला असे सर्व इस्राएल लोक ऐकतील तेव्हा तुझ्याबरोबरच्या सर्वांच्या हातांना जोर येईल.”

22 अबशालोमासाठी राजमंदिराच्या धाब्यावर एक तंबू दिला आणि सर्व इस्राएलांदेखत अबशालोम आपल्या पित्याच्या उपपत्नींपाशी गेला.

23 त्या काळात अहीथोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे; दावीद व अबशालोम ह्या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan