Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


दावीद अम्मोनी आणि अरामी ह्यांचा पराभव करतो
( १ इति. 19:1-19 )

1 पुढे अम्मोनी लोकांचा राजा मृत्यू पावला व त्याच्या जागी त्याचा पुत्र हानून राज्य करू लागला.

2 तेव्हा दावीद म्हणाला, “हानूनाचा बाप नाहाश ह्याने आपल्यावर दया केली तशीच मी त्याच्या पुत्रावर दया करीन.” म्हणून दाविदाने त्याच्या पित्याच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन करायला आपल्या सेवकांच्या हाती त्याला सांत्वनाचा निरोप पाठवला. मग दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले.

3 त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार आपला स्वामी हानून ह्याला म्हणाले की, “दाविदाने आपले सांत्वन करण्यासाठी लोक पाठवले आहेत ते आपल्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शवण्याकरता पाठवले आहेत असे आपल्याला वाटते काय? ह्या नगराची पाहणी व टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून दाविदाने आपले चाकर पाठवले आहेत; नाही काय?”

4 तेव्हा हानूनाने दाविदाच्या सेवकांना पकडले व त्यांची अर्धीअर्धी दाढी काढवून व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यांना पाठवून दिले.

5 हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घ्यायला माणसे पाठवली; कारण त्यांना मोठी लाज वाटत होती. राजाने त्यांना सांगून पाठवले की, “तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे राहा मग इकडे या.”

6 दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.

7 हे ऐकून दाविदाने यवाबाला योद्ध्यांच्या सर्व सैन्यासह पाठवले.

8 तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशीनजीक युद्धासाठी व्यूह रचला; इकडे सोबा व रहोब येथले अरामी आणि तोब व माका ह्यांचे शिपाई निराळ्या ठिकाणी मैदानात होते.

9 आपल्या मागे व पुढे व्यूह रचला आहे हे यवाबाने पाहून इस्राएली लढवय्यांपैकी निवडक शिपाई घेऊन त्यांना अराम्यांसमोर उभे केले;

10 वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्याने अम्मोन्यांसमोर त्यांची व्यूहरचना केली.

11 तो म्हणाला, “अरामी माझ्याहून प्रबल होऊ लागले तर तू माझे साहाय्य कर, पण अम्मोनी तुझ्याहून प्रबल झाले तर मी तुझे साहाय्य करीन.

12 हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.”

13 मग यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध करायला जवळ गेले, तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले;

14 अरामी पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अबीशय ह्याच्यापुढून पळून जाऊन नगरात शिरले. तेव्हा यवाब अम्मोन्यांशी लढण्याचे सोडून यरुशलेमेस परत आला.

15 इस्राएलापुढे आपण पराजित झालो असे अरामी लोकांनी पाहिले तेव्हा ते एकत्र जमा झाले.

16 हदरेजराने1 जासूद पाठवून महानदापलीकडील अराम्यांना आणवले; हदरेजराच्या सैन्याचा सेनापती शोबख ह्याच्या नायकत्वाखाली ते हेलाम येथे आले.

17 हे ऐकून दाविदाने अवघ्या इस्राएलास एकत्र केले व यार्देनेपार जाऊन तो हेलामास पोहचला. तेथे अरामी दाविदाविरुद्ध व्यूह रचून त्याच्याशी लढले.

18 तेव्हा अरामी इस्राएलापुढून पळून गेले आणि दाविदाने अराम्यांचे सातशे रथी व चाळीस हजार राऊत ठार केले आणि त्यांचा सेनापती शोबख ह्याला घायाळ केले; तो तेथेच गतप्राण झाला.

19 इस्राएलापुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजर राजाचे जितके अंकित होते तितक्यांनी इस्राएलांशी सल्ला केला व ते त्यांचे अंकित झाले; आणि अम्मोनी लोकांना इतःपर साहाय्य करण्याची अराम्यांना धास्ती वाटली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan