Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ राजे 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


इस्राएलाचा राजा म्हणून येहूला अभिषेक

1 नंतर अलीशा संदेष्ट्याने संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकाला बोलावून सांगितले, “कंबर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोथ-गिलाद येथे जा.

2 तेथे पोहचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी ह्याला शोधून काढ; मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदांतून उठवून आतल्या खोलीत घेऊन जा.

3 मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, ‘परमेश्वर म्हणतो, तू इस्राएलाचा राजा व्हावेस म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.’ मग दार उघडून पळ काढ, थांबू नकोस.”

4 नंतर तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे गेला.

5 तो तेथे जाऊन पोहचतो तर तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले; तेव्हा तो म्हणाला, “हे सरदारा, तुला काही सांगायचे आहे.” येहूने विचारले, “आम्हा सर्वांतून कोणाला?” तो म्हणाला, “हे सरदारा, तुला.”

6 तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे;

7 ईजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक ह्यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी अहाब ह्याच्या घराण्याचा तू संहार कर.

8 अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल; अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएलाच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन.

9 नबाटाचा पुत्र यराबाम व अहीयाचा पुत्र बाशा ह्यांच्या घराण्यांसारखे मी अहाबाच्या घराण्याचे करीन.

10 इज्रेलाच्या भूमीवर ईजबेलीस कुत्री खातील; तिला पुरायला कोणी असणार नाही.” मग दार उघडून त्याने पळ काढला.

11 येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकांकडे आला तेव्हा एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता?” तो त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय हे तुम्हांला माहीत आहेच.”

12 ते म्हणाले, “भलतेच; काय आहे ते आम्हांला सांग.” तो म्हणाला, “त्याने मला असे सांगितले. परमेश्वर म्हणतो तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.”

13 हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरवून त्याच्या पायांखाली पायर्‍यांवर पसरली आणि कर्णा वाजवून ‘येहू राजा झाला’ असा पुकारा केला.


येहू योरामास ठार मारतो

14 ह्या प्रकारे येहू बिन यहोशाफाट बिन निमशी ह्याने योरामाविरुद्ध फितुरी केली. (त्या वेळी योराम सर्व इस्राएलासह अरामाचा राजा हजाएल ह्याच्या भीतीमुळे रामोथ-गिलादाचे रक्षण करत होता;

15 पण अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढताना योराम1 राजाला अराम्यांच्या हातून जे घाव लागले होते ते सर्व बरे व्हावेत म्हणून तो इज्रेलास परत गेला होता.) येहू म्हणाला, “तुमच्या मनास येईल तर ह्या नगरातून कोणालाही इज्रेलास हे कळवण्यासाठी निसटून जाऊ देऊ नका.”

16 येहू रथात बसून इज्रेलास गेला; येथे योराम पडून होता आणि यहूदाचा राजा अहज्या हा त्याच्या भेटीला आला होता.

17 इज्रेल येथील बुरुजावर पहारेकरी उभा होता. त्याने येहू येत होता त्याची टोळी पाहिली; मग त्याने येऊन सांगितले की, “मला एक टोळी दिसत आहे.” तेव्हा योराम म्हणाला, “एक स्वार पाहून त्यांच्याकडे पाठव, त्याला विचारायला सांग की, “सर्वकाही ठीक आहे ना?”

18 तेव्हा त्याला भेटायला एक जण घोड्यावर बसून गेला व त्याला म्हणाला, “राजा असे विचारतो की सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “ठीक आहे किंवा नाही ह्याची तुला काय पंचाईत? चल, माझ्यामागे हो.” तेव्हा पहारेकर्‍याने सांगितले की, “जासूद त्यांच्याकडे गेला आहे पण तो काही परत आला नाही.”

19 मग त्याने दुसरा स्वार पाठवला. तो त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, राजा विचारतो की, “सर्वकाही ठीक आहे ना?” येहूने त्याला म्हटले, “ठीक आहे किंवा नाही ह्याची तुला काय पंचाईत? चल, माझ्यामागे हो.”

20 तेव्हा पहारेकर्‍याने सांगितले, “तोही त्यांच्याकडे गेला आहे पण परत आला नाही. त्याचे रथ हाकणे निमशीचा पुत्र येहू ह्याच्या रथ हाकण्यासारखे आहे; तो मोठ्या सपाट्याने रथ हाकत आहे.”

21 योराम म्हणाला, “रथ तयार करा.” तेव्हा त्यांनी त्याचा रथ तयार केला. इस्राएलाचा राजा योराम व यहूदाचा राजा अहज्या हे आपापल्या रथात बसून येहूला भेटायला गेले, आणि इज्रेलकर नाबोथ ह्याच्या शेतात त्यांची गाठ पडली.

22 योरामाने येहूला पाहिले तेव्हा तो म्हणाला, “येहू, सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे ह्यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?”

23 हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढला व अहज्याला म्हटले, “अहज्या, दगा रे दगा!”

24 येहूने आकर्ण धनुष्य ओढून योरामाच्या बाहूंच्या दरम्यान असा बाण मारला की तो त्याचा ऊर फोडून गेला आणि तो रथात कलंडून पडला.

25 तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर ह्याला सांगितले, “त्याला उचलून इज्रेली नाबोथाच्या शेतात फेकून दे; त्याचा बाप अहाब ह्याच्यामागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठव;

26 ‘परमेश्वर म्हणतो, काल नाबोथाचा व त्याच्या पुत्रांचा खून झाला तो मी पाहिलाच आहे; परमेश्वराचे असे म्हणणे आहे की ह्याच शेतात मी तुला त्याची उलटफेड करीन.’ तर आता परमेश्वराच्या वचनानुसार ह्याला उचलून शेतात टाक.”


येहू अहज्याला ठार मारतो
( २ इति. 22:7-9 )

27 हे पाहून यहूदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, “त्यालाही रथातच ठार करा.” त्यांनी त्याला इब्लामाजवळील गुरघाटात मार दिला. तो तसाच मगिद्दोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला.

28 तेव्हा त्याच्या चाकरांनी त्याला रथात घालून यरुशलेमेला नेले आणि दावीदपुरात त्याच्या वडिलांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली.

29 अहाबाचा पुत्र योराम ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी अहज्या यहूदावर राज्य करू लागला होता.


ईजबेलीचा मृत्यू

30 येहू इज्रेलास आल्याचे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यांत सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली.

31 येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, “आपल्या धन्याचा खून करणार्‍या जिम्री, सर्वकाही ठीक आहे ना?”

32 येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, “माझ्या पक्षाचा कोणी आहे काय?” तेव्हा दोघा-तिघा खोज्यांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले.

33 त्याने त्यांना सांगितले, “तिला खाली टाका.” त्यांनी तिला खाली टाकले, तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यांवर पडले आणि त्याने तिला पायांखाली तुडवले.

34 मग तो आत जाऊन खाऊनपिऊन म्हणाला, “जा; ती शापित स्त्री कोठे आहे ते पाहा व तिला मूठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे.”

35 तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची कवटी, पाय व हाताचे तळवे ह्यांखेरीज तिचे त्यांना काही सापडले नाही.

36 त्यांनी परत येऊन त्याला हे कळवले. तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराने आपला सेवक एलीया तिश्बी ह्याच्या द्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, ‘इज्रेलाच्या शेतात कुत्री ईजबेलीचे मांस खातील.

37 ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan