Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ राजे 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


कुर्‍हाड पाण्यावर तरंगते

1 संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलीशाला म्हटले, “पाहा,आम्ही आपणासमोर राहत आहोत ते स्थळ फार अपुरे आहे.

2 तर यार्देनेतीरी जाऊन तेथून एकेकाने एकेक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हांला परवानगी द्या.” त्याने म्हटले, “बरे, जा.”

3 एकाने त्याला म्हटले, “कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या.” तो म्हणाला, “बरे, येतो.”

4 तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेकडे येऊन लाकडे तोडू लागले.

5 एक जण तुळई तोडून पाडत असता कुर्‍हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली तेव्हा तो ओरडून म्हणाला, “हायहाय! स्वामी, मी ती मागून आणली होती.”

6 देवाच्या माणसाने विचारले, “ती कोठे पडली?” त्याने ती जागा दाखवल्यावर अलीशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले.

7 त्याने म्हटले, “ती काढून घे.” मग त्याने हात लांब करून ती घेतली. अलीशा व अरामी

8 मग अरामाच्या राजाने इस्राएलाबरोबर युद्ध आरंभले; त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की, “अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.”

9 तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाला सांगून पाठवले : “सावध राहा; अमुक अमुक ठिकाणी जाऊ नकोस; तेथे अरामी लोक चढाई करून येत आहेत.”

10 तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नकोस अशी सूचना इस्राएलाच्या राजाला देवाच्या माणसाने केली होती तेथे त्याने लोक पाठवले. असा आपला बचाव त्याने एकदोनदाच नव्हे तर अनेकदा केला.

11 ह्यावरून अरामाच्या राजाचे मन संतापले; त्याने आपल्या सेवकांना बोलावून विचारले, “आपल्यातला कोण इस्राएलाच्या राजाच्या पक्षाचा आहे हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय?”

12 त्याच्या एका सेवकाने त्याला सांगितले, “माझे स्वामीराज, असा कोणी नाही; पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्राएलातला संदेष्टा अलीशा हा इस्राएलाच्या राजाला कळवतो.”

13 त्याने म्हटले, “तो कोठे आहे ते पाहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्याला पकडून आणतो.” मग तो दोथान येथे आहे अशी त्याला बातमी लागली.

14 तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठवले; त्यांनी रातोरात जाऊन नगर वेढले.

15 सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ ह्यांसह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, “स्वामी, हायहाय! आता आपण काय करावे?”

16 तो म्हणाला, “भिऊ नकोस; त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.”

17 अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.

18 अरामी लोक अलीशावर चालून आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की, “ह्या लोकांना आंधळे कर.” अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यांना आंधळे केले.

19 अलीशा त्यांना म्हणाला, “हा रस्ता नव्हे तो रस्ता व हे नव्हे ते शहर; माझ्यामागून या म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करत आहात त्याच्याकडे मी तुम्हांला घेऊन जाईन.” मग तो त्यांना शोमरोनात घेऊन गेला.

20 ते शोमरोनात आल्यावर अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, ह्या लोकांचे डोळे उघड, ह्यांना दिसू दे.” परमेश्वराने त्यांचे डोळे उघडले. त्यांना दिसू लागले तेव्हा आपण शोमरोनामध्ये आहोत असे त्यांना दिसले.

21 त्यांना पाहून इस्राएलाचा राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी ह्यांना मारून टाकू काय?”

22 त्याने म्हटले, “ह्यांना मारू नकोस; तलवार व धनुष्य ह्यांनी पाडाव केलेल्यांना तू मारून टाकत असतोस काय? ह्यांच्यापुढे अन्नपाणी वाढ; ह्यांना खाऊनपिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.”

23 मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली; त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्यांना निरोप दिला; आणि ते आपल्या धन्याकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्राएल देशावर पुन्हा आल्या नाहीत.


अलीशा व शोमरोनाचा वेढा

24 त्यानंतर अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपले सर्व सैन्य एकत्र करून शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा घातला.

25 तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली; वेढा एवढा भारी पडला की, गाढवाच्या एका मुंडक्याला ऐंशी रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेला पाच रुपये पडू लागले.

26 इस्राएलाचा राजा तटावर फिरत असताना एका स्त्रीने ओरडून त्याला म्हटले, “अहो स्वामीराज, साहाय्य करा!”

27 तो म्हणाला, “परमेश्वर तुला साहाय्य करत नाही तर मी कोठून करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”

28 राजाने तिला विचारले, “तुला काय झाले?” तिने उत्तर दिले, “ही स्त्री मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलाला खाऊ.’

29 माझा मुलगा शिजवून आम्ही खाल्ला; पण दुसर्‍या दिवशी मी हिला म्हटले, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आपण त्याला खाऊ.’ तेव्हा हिने आपला मुलगा लपवून ठेवला.”

30 त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडली. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तेव्हा त्याने आतून आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळले आहे असे त्यांना दिसले.

31 तेव्हा तो म्हणाला, “शाफाटाचा पुत्र अलीशा ह्याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना ह्याहूनही अधिक करो.”

32 अलीशा त्या वेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडील जन बसले होते; राजाने आपल्या जवळचा एक जासूद पाठवला; तो जाऊन पोहचण्यापूर्वी अलीशा त्या वडील जनांना म्हणाला, “पाहा, ह्या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठवला आहे; तर तो जासूद आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्याला लोटून द्या; त्याच्या मागोमाग त्याच्या धन्याच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे, नाही काय?”

33 तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan