Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ राजे 25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यरुशलेमेचा पाडाव
( यिर्म. 39:1-7 ; 52:3-11 )

1 त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.

2 सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत नगराला वेढा पडला होता.

3 चवथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खायला मिळेना.

4 मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.

5 तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग करून त्याला यरीहोच्या मैदानात गाठले व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.

6 ते राजाला पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले; त्यांनी त्याची शिक्षा ठरवली.

7 त्यांनी सिद्कीयाच्या पुत्रांचा त्याच्या डोळ्यांदेखत वध केला आणि सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बेड्यांनी जखडून बाबेलास नेले.


यहूदाचा बंदीवास
( २ इति. 36:17-21 ; यिर्म. 39:8-10 ; 52:12-30 )

8 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमेला आला; हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता.

9 त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.

10 गारद्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेभोवतालचे सर्व तट पाडून टाकले.

11 शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक ह्यांना गारद्यांचा नायक नबुजरदान ह्याने कैद करून नेले.

12 देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.

13 परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी ही खास्दी लोकांनी फोडूनतोडून त्यांचे पितळ बाबेलास नेले.

14 पात्रे, फावडी, चिमटे, धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली.

15 अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली.

16 दोन खांब, गंगाळसागर व त्याच्या बैठकी हे सर्व शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी केले होते, ह्या सर्व उपकरणांचे पितळ अपरिमित होते.

17 एका खांबाची उंची अठरा हात असून त्यावर पितळेचा कळस होता; त्या कळसाची उंची तीन हात होती; त्या कळसाच्या सभोवार पितळेची जाळी व डाळिंबे केली होती; दुसर्‍या खांबालाही असेच जाळीचे काम होते.

18 गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले.

19 योद्ध्यांवर नेमलेल्या एका खोजाला त्याने नगरातून पकडून नेले; राजाच्या हुजुरास असणारे पाच पुरुष त्याला शहरात आढळले त्यांनाही त्याने नेले; त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतीचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी साठ माणसे ह्यांना त्याने नेले.

20 गारद्यांचा सरदार नबुजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले.

21 बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


मागे राहिलेल्यांचे मिसर देशास पलायन

22 यहूदा देशातील जे लोक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने राहू दिले होते त्यांच्यावर त्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला सुभेदार नेमले.

23 बाबेलच्या राजाने गदल्यास सुभेदार नेमले हे सेनानायकांनी व त्याच्या लोकांनी ऐकले, तेव्हा इश्माएल बिन नथन्या, योहानान बिन कारेह, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी आणि याजन्या बिन माकाथी व त्यांचे सर्व पुरुष मिस्पा येथे गदल्या ह्याच्याकडे आले.

24 तेव्हा गदल्या आणभाक करून त्यांना व त्यांच्या माणसांना म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची भीती धरू नका; देशात राहून बाबेलच्या राजाचे अंकित व्हा, म्हणजे तुमचे बरे होईल.”

25 सातव्या महिन्यात राजवंशातला इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा ह्याने दहा माणसांसह येऊन गदल्याला ठार मारले; तसेच मिस्पा येथे त्याच्याबरोबर असलेले यहूदी व खास्दी ह्यांनाही त्याने ठार मारले.

26 तेव्हा लहानथोर सर्व लोक आणि सेनांचे नायक मिसर देशाला निघून गेले; त्यांना खास्द्यांचा धाक पडला होता.


यहोयाखीनाची सुटका व त्याचा बाबेलात सत्कार
( यिर्म. 52:31-34 )

27 यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी बाबेलचा राजा अबील-मरोदख राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याला कारागृहातून काढून त्याचा सत्कार केला.

28 त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले.

29 त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली व तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे.

30 त्याच्या निर्वाहासाठी त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan