Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ राजे 22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


योशीया व नियमशास्त्राचा ग्रंथ
( २ इति. 34:1-2 , 8-33 )

1 योशीया राज्य करू लागला तेव्हा तो आठ वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकथ येथला अदाया ह्याची कन्या.

2 परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला त्यानेच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही.

3 आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीया राजाने आपला चिटणीस शाफान बिन असल्या बिन मशुल्लाम ह्याला परमेश्वराच्या मंदिरात पाठवले.

4 त्याने त्याला सांगितले, “जा, मुख्य याजक हिल्कीया ह्याला सांग की जो पैसा परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमवला आहे त्याचा हिशोब करा.

5 मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्‍या कामदारांना द्या; त्यांनी तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरांना द्यावा.

6 सुतार, बांधकाम करणारे व गवंडी ह्यांना तो द्यावा; तसेच मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती लाकूड व घडीव चिरे विकत घ्यावेत.”

7 ज्यांच्या हाती तो पैका दिला होता, त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करत.”

8 मुख्य याजक हिल्कीया ह्याने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला व त्याने तो वाचला.

9 शाफान चिटणीसाने राजाकडे परत येऊन त्याला असे कळवले की, “आपल्या सेवकाला मंदिरात जो पैसा मिळाला तो सर्व त्यांनी थैल्यांत भरून परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्‍या कामदारांच्या हवाली केला आहे.”

10 शाफान चिटणिसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला.

11 त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली.

12 मग त्याने हिल्कीया याजक, अहीकाम बिन शाफान, अखबोर बिन मिखाया, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की,

13 “हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे, प्रजेच्यातर्फे व सर्व यहूदाच्यातर्फे परमेश्वराला प्रश्‍न करा; आमच्या वाडवडिलांनी ह्या ग्रंथातली वचने ऐकली नाहीत व आमच्यासाठी जे ह्यात लिहिले आहे ते पाळले नाही म्हणून परमेश्वराचा आमच्यावर मोठा क्रोध भडकला आहे.”

14 तेव्हा हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान व असाया हे हुल्दा संदेष्ट्रीकडे गेले व तिच्याशी त्यांनी भाषण केले. ती शल्लूम बिन तिकवा बिन हरहस नावाचा जामदार ह्याची स्त्री असून ती त्या वेळी यरुशलेमेच्या दुसर्‍या पेठेत राहत होती.

15 ती त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘ज्या पुरुषाने तुम्हांला माझ्याकडे पाठवले त्याला जाऊन सांगा.

16 परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाच्या राजाने जो ग्रंथ वाचला त्यातील सर्व वचनांप्रमाणे ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर मी गहजब आणीन.

17 कारण ह्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे, म्हणून ह्या स्थानावर माझा क्रोध भडकेल, तो शांत व्हायचा नाही.

18 तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्‍न करायला पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा : इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,

19 तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि हे स्थान व ह्यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तू आपली वस्त्रे फाडलीस व माझ्यासमोर रडलास ह्यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.

20 तर पाहा, मी असे करीन की तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत सुरक्षितपणे पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थलावर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.”’ त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan