Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ राजे 21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मनश्शेची कारकीर्द
( २ इति. 33:1-20 )

1 मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव हेफ्सीबा असे होते.

2 इस्राएल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रांना घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले.

3 त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.

4 परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत मी आपले नाव ठेवीन” त्यात त्याने वेद्या बांधल्या.

5 परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या.

6 त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.

7 आपण केलेली अशेरामूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यात मी आपले नाम निरंतर ठेवीन;

8 मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र दिले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते निघून चोहोकडे भटकतील असे मी करणार नाही.”

9 पण त्यांनी ऐकले नाही. मनश्शेने त्यांना एवढे बहकवले की इस्राएलांदेखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्यापेक्षाही ते अधिकच दुष्कर्म करू लागले.

10 ह्यासाठी परमेश्वर आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे बोलला, तो म्हणाला,

11 “यहूदाचा राजा मनश्शे ह्याने ही अमंगळ कृत्ये केली आहेत; पूर्वीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्कर्म केले आहे आणि आपण मूर्तींच्या नादी लागून यहूदालाही पाप करायला लावले आहे;

12 म्हणून इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,“पाहा, मी यरुशलेम व यहूदा ह्यांवर एवढे अरिष्ट आणणार आहे की ज्याच्या कानावर ते जाईल त्याचे दोन्ही कान भणभणतील.

13 मी शोमरोनावर लावलेले मापनसूत्र व अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा यरुशलेमेला लावीन; थाळी जशी घासूनपुसून व उलथीपालथी करून ठेवतात तसेच मी यरुशलेमेचे करीन.

14 शेष राहिलेल्या माझ्या वतनरूप लोकांचा मी त्याग करीन; त्यांना शत्रूंच्या हाती देईन; ते आपल्या सर्व शत्रूंचे भक्ष्य व लूट होतील;

15 कारण त्यांचे पूर्वज मिसर देशातून बाहेर निघाले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी मला संताप आणला आहे.”

16 मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदाला पाप करायला लावले, एवढेच नव्हे तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत यरुशलेम रक्तमय केले.

17 मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते सर्व आणि त्याने केलेले पापकर्म ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?

18 मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याच्या वाड्याच्या बागेत म्हणजे अर्थात उज्जाच्या बागेत त्याला मूठमाती देण्यात आली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन हा राजा झाला.


आमोनाची कारकीर्द
( २ इति. 33:21-25 )

19 आमोन राज्य करू लागला तेव्हा तो बावीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत दोन वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ असे होते; ती यटबा येथला हारूस ह्याची कन्या.

20 त्याने आपला बाप मनश्शे ह्याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

21 त्याचा बाप ज्या मार्गांनी चालला त्याने तो चालला; ज्या मूर्तींची त्याच्या बापाने पूजा केली त्यांची पूजा त्यानेही केली.

22 आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला त्याने सोडले; तो परमेश्वराच्या मार्गाने चालला नाही.

23 आमोनाच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी केली; त्यांनी राजाला त्याच्याच वाड्यात जिवे मारले;

24 पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांना देशातल्या लोकांनी जिवे मारले, आणि त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया ह्याला राजा केले.

25 आमोनाची बाकीची कृत्ये यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत, नाहीत काय?

26 आमोनाला उज्जाच्या बागेत त्यानेच बांधलेल्या थडग्यात मूठमाती देण्यात आली; त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया हा राजा झाला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan