२ राजे 20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)हिज्कीयाचे दुखणे ( २ इति. 32:24-26 ; यश. 38:1-22 ) 1 त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.” 2 तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली; तो म्हणाला, 3 “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला. 4 तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहचतो तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा : 5 “परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. 6 मी तुझे आयुष्य पंधरा वर्षांनी वाढवतो; मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन; माझ्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी मी ह्या नगराचे संरक्षण करीन.” 7 यशयाने सांगितले, “अंजिराची एक चांदकी आणा.” ती त्यांनी आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला. 8 हिज्कीयाने यशयाला विचारले की, “तिसर्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिराकडे चढून जाईन ह्याची खूण काय?” 9 यशया म्हणाला, “परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच ह्याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे : शंकुयंत्रावरील छाया दहा अंश पुढे जावी की मागे यावी?” 10 हिज्कीयाने म्हटले, “छाया दहा अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे; तर छाया दहा अंश मागे यावी.” 11 यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया दहा अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली. हिज्कीयाला बाबेलचे जासूद भेटतात ( २ इति. 32:27-31 ; यश. 39:1-8 ) 12 त्या वेळेस बाबेलचा राजा बलदानाचा पुत्र बरोदख बलदान ह्याने हिज्कीयाला पत्र व नजराणा पाठवला. कारण तो आजारी असल्याचे त्याने ऐकले होते. 13 तेव्हा हिज्कीयाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यांना दाखवले; आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखवले; हिज्कीयाने दाखवले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते. 14 मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ती माणसे काय म्हणाली व ती तुझ्याकडे कोठून आली होती?” हिज्कीयाने उत्तर दिले, “ती दूर देशाहून माझ्याकडे आली होती.” 15 मग त्याने विचारले, “त्यांनी तुझ्या घरात काय काय पाहिले?” हिज्कीया म्हणाला, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; माझ्या भांडारातले मी त्यांना दाखवले नाही असे काहीच नाही.” 16 तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन ऐक : 17 पाहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी जे आजवर साठवून ठेवले आहे ते सर्व बाबेलास घेऊन जातील, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. 18 तुझ्यापासून होणारे तुझ्या पोटचे पुत्र ह्यांना ते नेतील व बाबेलच्या राजवाड्यात ते खोजे होऊन राहतील.” 19 तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “आपण सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे.” तो आणखी म्हणाला, “माझ्या कारकिर्दीत तरी शांतता व स्थिरता ही राहणार ना?” हिज्कीयाचा मृत्यू ( २ इति. 32:32-33 ) 20 हिज्कीयाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? 21 हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India