Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ राजे 16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


आहाजाची कारकीर्द
( २ इति. 28:1-27 )

1 पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला.

2 आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही.

3 तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गाने चालला; ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांच्या अमंगळ आचारांना अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पण केले.

4 तो उच्च स्थानी, पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करत असे व धूप जाळत असे.

5 मग अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेवर चढाई करून युद्धास आले; त्यांनी आहाजाला वेढा दिला पण त्यांना त्याला जिंकता आले नाही.

6 त्या वेळी अरामाचा राजा रसीन ह्याने एलाथ नावाचे नगर सर करून पुन्हा अरामात सामील केले व तेथल्या यहूदी लोकांना हाकून दिले; अरामी लोक तेथे जाऊन राहिले, ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत.

7 मग आहाजाने अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “मी आपला सेवक, आपला मुलगा आहे, तर आता अरामाचा राजा व इस्राएलाचा राजा हे माझ्यावर चढाई करून आले आहेत. आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा.”

8 परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढे सोनेरुपे आहाजास सापडले तेवढे त्याने अश्शूराच्या राजाकडे नजराणा म्हणून पाठवले.

9 त्याचे मागणे मान्य करून अश्शूराच्या राजाने दिमिष्कावर चढाई करून ते घेतले व तेथील लोकांना पाडाव करून कीर येथे नेले; आणि रसीन ह्याचा वध केला.

10 तेव्हा अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याच्या भेटीसाठी आहाज राजा दिमिष्क येथे गेला; त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण ह्यांचा नमुना उरीया याजकाकडे पाठवून दिला.

11 आहाज राजाने दिमिष्काहून पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरीया याजकाने एक वेदी आहाज राजा दिमिष्काहून येण्यापूर्वी तयार केली.

12 राजा दिमिष्काहून परत आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली; त्याने त्या वेदीजवळ जाऊन तिच्यावर बली अर्पण केले.

13 त्या वेदीवर त्याने आपले होमबली व अन्नबली ह्यांचे होम केले, आपली पेयार्पणे तिच्यावर ओतली व आपल्या शांत्यर्पणांच्या बलींचे रक्त त्या वेदीवर शिंपडले.

14 परमेश्वरापुढे असलेली पितळेची वेदी जी मंदिरापुढे म्हणजे वेदी व परमेश्वराचे मंदिर ह्यांच्या दरम्यान होती ती तेथून काढून त्याने तयार केलेल्या ह्या वेदीच्या उत्तरेकडे ठेवली.

15 आहाज राजाने उरीया याजकाला आज्ञा केली की, “नित्य सकाळचा होमबली, संध्याकाळचा अन्नबली, राजाचे होमबली व अन्नबली, आणि देशातील सगळ्या लोकांचे होमबली व पेयार्पणे ही मोठ्या वेदीवर अर्पावीत; होमबली व इतर यज्ञपशू ह्यांचे रक्त त्या वेदीवर शिंपडावे; पितळेची वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.”

16 आहाज राजाच्या आज्ञेप्रमाणे उरीया याजकाने केले.

17 मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावर असलेले गंगाळ काढले, आणि गंगाळसागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवला.

18 शब्बाथ दिवसासाठी जी चांदणी मंदिरात बांधली होती ती व राजाला बाहेरून प्रवेश करण्यासाठी जे दार केले होते ते, ही दोन्ही मंदिरापासून वेगळी करण्यात आली.

19 आहाजाने केलेल्या बाकीच्या गोष्टी यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केल्या आहेत, नाहीत काय?

20 आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली; त्याचा पुत्र हिज्किया हा त्याच्या जागी राजा झाला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan