२ राजे 15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)अजर्याची कारकीर्द ( २ इति. 26:3-5 , 16-23 ) 1 इस्राएलाचा राजा यराबाम ह्याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अजर्या2 बिन अमस्या राज्य करू लागला. 2 तो राज्य करू लागला तेव्हा सोळा वर्षांचा होता, त्याने यरुशलेमेत बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या, ती यरुशलेमकरीण होती. 3 त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. 4 तरी उच्च स्थाने काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अद्यापि उच्च स्थानी यज्ञ करत व धूप जाळत होते. 5 परमेश्वराने राजाला अशी शिक्षा केली की तेणेकरून तो आमरण कोडी झाला; तो निराळ्या घरात राहत असे. राजपुत्र योथाम हा त्याचा खानगी कारभारी होऊन देशातील लोकांचा न्यायनिवाडा करत असे. 6 अजर्याच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? 7 अजर्या3 आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राजा झाला. जखर्याची कारकीर्द 8 यहूदाचा राजा अजर्या ह्याच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी जखर्या बिन यराबाम इस्राएलावर शोमरोनात राज्य करू लागला; त्याने सहा महिने राज्य केले. 9 त्याने आपल्या वाडवडिलांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत. 10 याबेशाचा पुत्र शल्लूम ह्याने त्याच्याशी फितुरी करून व त्याला लोकांदेखत मार देऊन वधले, आणि त्याच्या जागी तो राजा झाला. 11 जखर्याची बाकीची कृत्ये इस्राएलाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत ती पाहा. 12 परमेश्वराने येहूस सांगितले होते की, “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलाच्या गादीवर बसतील.” त्याप्रमाणे घडून आले. शल्लूमची कारकीर्द 13 यहूदाचा राजा उज्जीया1 ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी शल्लूम बिन याबेश हा राज्य करू लागला; त्याने शोमरोनात एक महिना राज्य केले. 14 मनहेम बिन गादी हा तिरसा येथून शोमरोनास गेला आणि तेथे त्याने शल्लूम बिन याबेश ह्याला मार देऊन वधले आणि त्याच्या जागी तो राजा झाला. 15 शल्लूमाची बाकीची कृत्ये व त्याने केलेले बंड ह्या सर्वांचे इस्राएलाच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे ते पाहा. 16 मग मनहेमाने तिरसा येथून निघून तिफसाहात व त्याच्या शिवारात राहणार्या लोकांना मार दिला; त्यांनी त्याला आपल्या वेशी उघडल्या नाहीत म्हणून त्याने त्यांना हा मार दिला; त्याने तेथल्या गर्भवती स्त्रिया चिरून काढल्या. मनहेमची कारकीर्द 17 यहूदाचा राजा अजर्या ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी मनहेम बिन गादी इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने दहा वर्षे शोमरोनात राज्य केले. 18 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने आमरण सोडली नाहीत. 19 अश्शूरचा राजा पूल ह्याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने मदत करून गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्याला एक हजार किक्कार2 चांदी दिली. 20 अश्शूराच्या राजाला देण्यासाठी मनहेमाने इस्राएलातल्या मोठमोठ्या धनवान लोकांकडून प्रत्येकी पन्नास शेकेल चांदी काढली. मग अश्शूरचा राजा परत गेला, देशात थांबला नाही. 21 मनहेमाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? 22 मनहेम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; आणि त्याचा पुत्र पकह्या हा त्याच्या जागी राजा झाला. पकह्याची कारकीर्द 23 यहूदाचा राजा अजर्या ह्याच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी पकह्या बिन मनहेम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने दोन वर्षे राज्य केले. 24 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत. 25 त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने त्याच्याशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोर्यात त्याला व त्याच्याबरोबर अर्गोब व अरये ह्यांना वधले; पेकहाबरोबर पन्नास गिलादी लोक होते; त्यांना वधून त्याच्या जागी तो राजा झाला. 26 पकह्याची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, ते पाहा. पेकहाची कारकीर्द 27 यहूदाचा राजा अजर्या ह्याच्या बावन्नाव्या वर्षी पेकह बिन रमाल्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने वीस वर्षे राज्य केले. 28 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत. 29 इस्राएलाचा राजा पेकह ह्याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याने येऊन ईयोन, आबेल-बेथ-माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद व गालील तसेच सबंध नफताली प्रांत घेतला; तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले. 30 उज्जीयाचा3 पुत्र योथाम ह्याच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी होशे बिन एला ह्याने पेकह बिन रमाल्या ह्याच्याशी फितुरी करून त्याला मार देऊन त्याचा वध केला आणि तो त्याच्या गादीवर बसला. 31 पेकह ह्याची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, ते पाहा. योथामाची कारकीर्द ( २ इति. 27:1-9 ) 32 इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी यहूदाचा राजा योथाम बिन उज्जीया राज्य करू लागला. 33 तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा असे होते; ती सादोकाची कन्या. 34 परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले; त्याचा बाप उज्जीया ह्याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला. 35 तरी उच्च स्थाने काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अद्यापि उच्च स्थानी यज्ञ करत व धूप जाळत होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा त्याने बांधला. 36 योथामाची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? 37 त्या काळी अरामाचा राजा रसीन व रमाल्याचा पुत्र पेकह ह्यांना परमेश्वर यहूदावर चढाई करण्यास पाठवू लागला. 38 योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या नगरात त्याच्या पितरांमध्ये त्याला मूठमाती दिली; त्याचा पुत्र आहाज हा त्याच्या जागी राजा झाला. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India