Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ राजे 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यहोआहाजाची कारकीर्द

1 यहूदाचा राजा अहज्याचा पुत्र योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने सतरा वर्षे राज्य केले.

2 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाच्या हातून जी पापकर्मे करवली त्यांचे अवलंबन त्याने केले; व ती त्याने सोडून दिली नाहीत.

3 ह्यास्तव इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्यांना यहोआहाज हयात होता तोपर्यंत अरामाचा राजा हजाएल व त्याचा पुत्र बेन-हदाद ह्यांच्या स्वाधीन केले.

4 यहोआहाजाने परमेश्वराला विनवणी केली ती त्याने ऐकली; अरामाचा राजा इस्राएलास कसा गांजत होता हे परमेश्वराने पाहिले होते.

5 परमेश्वराने इस्राएलास सोडवणारा दिला तेव्हा इस्राएल लोक अरामाच्या ताब्यातून सुटून आपापल्या डेर्‍यांत पूर्वीप्रमाणे राहू लागले.

6 तरी यराबामाच्या घराण्याने जी पापकर्मे केली व जी त्याने इस्राएल लोकांकडून करवली त्या पापकर्मांप्रमाणे ते चालले; शोमरोनात अशेरामूर्तीही राहिल्या होत्या.

7 अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सेनेत केवळ पन्नास स्वार, दहा रथ व दहा हजार पायदळ एवढेच राहू दिले होते व बाकीच्यांचा नाश करून त्यांना तुडवून धुळीस मिळवले होते.

8 यहोआहाज ह्याची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते व त्याचा पराक्रम ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?

9 यहोआहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्यांनी त्याला शोमरोनात मूठमाती दिली; त्याचा पुत्र योवाश हा त्याच्या जागी राजा झाला. इस्राएलाचा राजा यहोआश ह्याची कारकीर्द

10 यहूदाचा राजा योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या सदतिसाव्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र यहोआश शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने सोळा वर्षे राज्य केले.

11 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली होती ती त्याने सोडली नाहीत; त्यांप्रमाणे तो चालला.

12 योवाशाची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते आणि यहूदाचा राजा अमस्या ह्याच्याशी तो कसा शौर्याने लढला त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?

13 योवाश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि यराबाम त्याच्या गादीवर बसला; योवाशाला शोमरोनात इस्राएलाच्या राजांबरोबर मूठमाती दिली.


अलीशाचा अखेरचा संदेश व मृत्यू

14 ज्या दुखण्याने अलीशा मरणार होता ते त्याला आता लागले; तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्याच्याकडे गेला. तो ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, “बाबा! अहो बाबा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!”

15 अलीशाने त्याला सांगितले, “धनुष्यबाण घेऊन ये.” तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याच्याकडे आला.

16 त्याने इस्राएलाच्या राजाला सांगितले, “धनुष्याला आपला हात लाव.” त्याने आपला हात धनुष्याला लावला; तेव्हा अलीशाने आपले हात राजाच्या हातांवर ठेवले.

17 मग त्याने सांगितले, “पूर्वेकडील खिडकी उघड.” त्याने ती उघडली. मग अलीशा त्याला म्हणाला, “बाण सोड.” तेव्हा त्याने तो सोडला. तो म्हणाला, “हा बाण परमेश्वराकडून होणार्‍या सोडवणुकीचे म्हणजे अरामापासून सुटण्याचे चिन्ह होय; तू अफेक येथे अराम्यांना असा मार देशील की त्यांचा धुव्वा उडेल.”

18 त्याने त्याला म्हटले, “बाण उचलून घे.” त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “जमिनीवर बाण मार.” तो तीनदा मारून थांबला.

19 देवाचा माणूस त्याच्यावर रागावून म्हणाला, “तू पाचसहा वेळा बाण मारायचे असते, म्हणजे अरामाचा क्षय होईपर्यंत तू त्याला मार दिला असतास; आता तू त्याला तीन वेळा मात्र मार देशील.”

20 ह्यानंतर अलीशा मृत्यू पावला, व लोकांनी त्याला मूठमाती दिली. मग नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली.

21 तेव्हा लोक एका मनुष्याला मूठमाती देत असताना त्यांच्या नजरेला एक टोळी पडली; आणि त्यांनी ते प्रेत अलीशाच्या कबरेत टाकले, तेव्हा अलीशाच्या अस्थींना स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन आपल्या पायांवर उभा राहिला.

22 यहोआहाज ह्याच्या सर्व हयातीत अरामाचा राजा हजाएल ह्याने इस्राएलास त्रस्त केले.

23 तरी परमेश्वराची त्यांच्यावर कृपा होती; देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या करारामुळे त्याची इस्राएलावर कृपा होती; त्यांचा त्याला कळवळा होता व त्यांच्यावर त्याची मेहेरनजर होती, म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही व आपल्यासमोरून त्यांना दूर केले नाही.

24 अरामाचा राजा हजाएल हा मृत्यू पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदाद त्याच्या जागी राजा झाला.

25 बेन-हदाद बिन हजाएल ह्याने यहोआहाज ह्याच्याशी युद्ध करून जी नगरे घेतली होती ती त्याचा पुत्र यहोआश ह्याने परत घेतली. योवाशाने त्याला तीनदा मार देऊन इस्राएली नगरे परत घेतली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan