२ राजे 10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)येहू अहाबाच्या घराण्याचा नाश करतो 1 अहाबाचे सत्तर पुत्रपौत्र शोमरोनात राहत असत. येहूने इज्रेल येथील वडील जनांपैकी जे अधिकारी होते त्यांना आणि अहाबाच्या पुत्रांचे पालन करणे ज्यांच्याकडे होते त्यांना पत्रे लिहून शोमरोनास पाठवली; त्यांत असे म्हटले होते : 2 “तुमच्या धन्याचे पुत्रपौत्र तुमच्यामध्ये राहत आहेत; तुमच्या स्वाधीन रथ, घोडे, तटबंदी नगर व हत्यारेही आहेत; तर हे पत्र तुम्हांला पोहचताच 3 तुमच्या धन्याच्या पुत्रांपैकी जो उत्तम व योग्य असेल त्याला निवडून त्याच्या बापाच्या गादीवर बसवा आणि तुमच्या धन्याच्या कुळासाठी युद्ध करा.” 4 ह्यावरून ते अतिशय घाबरले, आणि ते म्हणाले, “ह्याच्यासमोर दोन राजांचा टिकाव लागला नाही तर आमचा कसा लागेल?” 5 मग राजाचा खानगी कारभारी, नगरचा अधिकारी, तेथील वडील जन आणि त्या मुलांचे पालन करणारे ह्या सर्वांनी येहूला सांगून पाठवले की, “आम्ही आपले दास आहोत, आपण आम्हांला सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा करणार नाही; आपल्या नजरेला बरे दिसेल ते करा.” 6 मग त्याने त्यांना दुसर्यांदा पत्र लिहून पाठवले, ते असे : “तुम्ही माझ्या पक्षाचे असल्यास व माझे म्हणणे मानत असल्यास आपल्या धन्याच्या पुत्रपौत्रांची शिरे छेदून उद्या ह्या वेळेपर्यंत माझ्याकडे इज्रेल येथे हजर व्हा.” राजपुत्र सत्तर होते, त्यांचे पाबन करणार्या नगरातल्या थोर लोकांजवळ ते राहत असत. 7 ते पत्र त्यांना जाऊन पोहचताच त्यांनी त्या सत्तर राजपुत्रांना पकडून त्यांचा वध केला आणि त्यांची शिरे टोपल्यात घालून त्याच्याकडे इज्रेल येथे पाठवून दिली. 8 एका जासुदाने त्याला सांगितले, “राजपुत्रांची शिरे हजर आहेत.” त्याने त्यांना सागितले, “वेशीजवळ त्यांच्या दोन राशी करून सकाळपर्यंत ठेवा.” 9 सकाळी तो बाहेर जाऊन उभा राहिला व सर्व लोकांना म्हणाला, “तुम्ही न्यायी आहात, मी आपल्या धन्याविरुद्ध कट करून त्याचा घात केला, पण या सर्वांचा वध कोणी केला?” 10 हे पक्के समजा की अहाबाच्या घराण्याविषयी परमेश्वर जे म्हणाला आहे त्यातला एकही शब्द व्यर्थ व्हायचा नाही. परमेश्वराने आपला सेवक एलीया ह्याच्या द्वारे जे सांगितले ते त्याने केले आहे. 11 इज्रेल येथे अहाबाच्या घराण्यातील जे लोक उरले होते ते सर्व, त्याचे सर्व थोर पुरुष, जिवलग मित्र व याजक ह्यांचा येहूने वध केला, त्यांतला एकही शेष राहू दिला नाही.” 12 मग तो उठून शोमरोनास जायला निघाला. मार्गात येहू मेंढपाळांच्या लोकर कातरण्याच्या वाड्याजवळ आला असताना, 13 यहूदाचा राजा अहज्या ह्याचे भाऊ त्याला भेटले; तेव्हा त्याने विचारले, “तुम्ही कोण?” त्यांनी सांगितले, “आम्ही अहज्याचे भाऊबंद आहोत, आम्ही राजपुत्रांच्या व राजमातेच्या पुत्रांच्या समाचारास चाललो आहोत.” 14 तेव्हा त्याने सांगितले, “ह्यांना जिवंत पकडा.” त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि त्या चाळीस पुरुषांना त्या मेंढरे कातरण्याच्या जागेजवळील हौदानजीक जिवे मारण्यात आले; त्याने त्यांच्यातल्या एकालाही जिवंत ठेवले नाही. 15 तो तेथून निघाल्यावर रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीला येताना त्याला आढळला; त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्याला म्हटले, “तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय?” यहोनादाब म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “असे असेल तर मला तुझा हात दे.” त्याने त्याला हात दिला आणि आपल्या रथात घेतले. 16 तो त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर चल; परमेश्वराप्रीत्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पाहा.” ह्या प्रकारे त्याने त्याला रथात बसवून घेतले. 17 परमेश्वराने एलीयाला सांगितले होते त्या वचनानुसार येहूने शोमरोनास येऊन अहाबाचे जितके लोक तेथे उरले होते त्या सर्वांचा वध करून अहाबाला नामशेष केले. येहू बआल दैवताची उपासना समूळ नष्ट करतो 18 नंतर येहूने सर्व लोकांना जमा करून सांगितले, “अहाबाने बआलमूर्तीची सेवा थोडी केली; येहू त्याची फार सेवा करणार. 19 तर आता बआलमूर्तीचे सर्व संदेष्टे, सर्व उपासक आणि सर्व याजक ह्यांना माझ्याकडे बोलावून आणा, त्यांच्यातला कोणीही मागे राहू देऊ नका; बआलाप्रीत्यर्थ मला महायज्ञ करायचा आहे. जो कोणी मागे राहील त्याला देहान्त शिक्षा होईल.” बआलमूर्तीच्या सर्व उपासकांचा संहार करावा म्हणून येहूने ही कपटयुक्ती योजली. 20 येहू म्हणाला, “बआलाप्रीत्यर्थ एक पवित्र महासभा भरवा.” तेव्हा लोकांनी दवंडी पिटली. 21 येहूने सर्व इस्राएलात जासूद पाठवले; तेव्हा बआलमूर्तीचे सर्व उपासक आले, त्यांतला एकही आल्यावाचून राहिला नाही. ते सर्व बआलाच्या देवळात जमा झाले; तेव्हा बआलाचे देऊळ येथूनतेथून सगळे गच्च भरले. 22 वस्त्रभांडाराचा कारभारी होता त्याला त्याने सांगितले, “बआलाच्या उपासकांसाठी वस्त्रे भांडारातून काढ.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी वस्त्रे काढून आणली. 23 नंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब हे बआलाच्या देवळात गेले; येहू बआलाच्या उपासकांना म्हणाला, “येथे तुमच्याबरोबर परमेश्वराचे कोणी उपासक आहेत किंवा सर्व केवळ बआलाचे उपासक आहेत हे तपासून पाहा.” 24 मग ते यज्ञ करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यास आत गेले. इकडे येहूने ऐंशी पुरुष बाहेर ठेवले होते त्यांना त्याने सांगितले की, “जी माणसे मी तुमच्या हवाली करीन त्यांतला कोणी निसटून गेला तर जो त्याला जाऊ देईल त्याचा प्राण त्याच्याऐवजी घेण्यात येईल.” 25 होमबली अर्पण करण्याचे संपले तेव्हा येहूने पहारेकर्यांना व सरदारांना सांगितले की, “आत जाऊन त्यांचा वध करा; एकालाही बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी तलवारीच्या धारेखाली त्यांचा संहार केला; त्या पहारेकर्यांनी व सरदारांनी त्यांना बाहेर फेकून दिले आणि बआलाच्या देवळाच्या गढीत ते गेले. 26 बआलाच्या देवळात जे स्तंभ होते ते त्यांनी बाहेर काढून जाळून टाकले. 27 त्यांनी बआलाच्या मूर्तीस्तंभाचा भंग केला, आणि त्याचे देऊळ मोडून त्याचे शौचकूप केले; ते आजवर आहे. 28 ह्या प्रकारे येहूने इस्राएल लोकांतून बआलमूर्ती काढून टाकली. 29 तथापि नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएल लोकांना ज्या पापकर्मांच्या योगाने पाप करायला लावले ती पापकर्मे, अर्थात बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे ह्यांचा नाद येहूने सोडला नाही. 30 परमेश्वर येहूला म्हणाला, “माझ्या दृष्टीने जे बरे ते तू केले आहेस, माझ्या मनोदयाप्रमाणे तू अहाबाच्या घराण्याचे केले आहेस म्हणून तुझ्या चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलाच्या गादीवर बसतील.” 31 पण येहूने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्याची पूर्ण मनाने खबरदारी घेतली नाही. यराबामाने इस्राएलाकडून ज्या कर्मांच्या योगे पाप करवले त्यांचा नाद त्याने सोडला नाही. 32 त्या काळी परमेश्वर इस्राएलाची छाटाछाट करू लागला; हजाएलाने इस्राएलाच्या सार्या मुलखात त्यांना मार दिला; 33 यार्देनेच्या पूर्व थडीकडील सर्व गिलाद देश आणि गादी, रऊबेनी व मनश्शे ह्यांचा देश म्हणजे आर्णोन खोर्याजवळील अरोएरापासून गिलाद व बाशान येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने घेतला. 34 येहूच्या बाकीच्या गोष्टी, त्याने केलेली सर्व कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? 35 येहू आपल्या पितरांजवळ जाऊन निजला तेव्हा लोकांनी त्याला शोमरोन येथे मूठमाती दिली. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोआहाज हा गादीवर बसला. 36 येहूने शोमरोनात इस्राएलावर अठ्ठावीस वर्षे राज्य केले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India