२ करिंथ 11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)प्रेषित म्हणून त्याचा हक्क 1 माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे; आणि ते तुम्ही करतच आहात. 2 कारण तुमच्याविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे; मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. 3 तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. 4 कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हांला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. 5 अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो. 6 जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही; हे आम्ही तुमच्यासंबंधाने सर्व लोकांत व सर्व प्रकारे प्रकट केले. 7 तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता तुम्हांला विनामूल्य सांगितली, हे मी पाप केले काय? 8 मी तुमची सेवा करावी म्हणून दुसर्या मंडळ्यांपासून वेतन घेऊन त्यांना लुटले; 9 आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही; कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली; आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही. 10 ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठायी आहे, आणि मी सांगतो की, माझ्या ह्या अभिमानास अखया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. 11 मी का बरे जपावे? मी तुमच्यावर प्रीती करत नाही म्हणून काय? देवाला ठाऊक आहे. 12 जे मी करतो ते करत राहीन; अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये, म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवतात, त्या बाबतीत त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे. 13 कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. 14 ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. 15 म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल. पौल व त्याचे विरोधी ह्यांची तुलना 16 मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये; जर तुम्ही तसे समजत असाल तर जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन. 17 जे मी बोलतो ते प्रभूला अनुसरून नव्हे, तर प्रौढीला अनुसरून मूढपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो. 18 देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार. 19 कारण तुम्ही शहाणे आहात म्हणून आनंदाने मूढांचे सहन करता. 20 कारण कोणी तुम्हांला गुलामगिरीत लोटले, तुम्हांला खाऊन टाकले, तुम्हांला अंकित केले, स्वत:ला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता. पौलाने सोसलेली संकटे व अडचणी 21 स्वतःला हिणवून मी हे बोलतो; तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो). 22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे. 23 ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (हे मी वेडगळासारखे बोलतो); श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 24 पाच वेळा मी यहूद्यांच्या हातून एकोणचाळीस फटके खाल्ले. 25 तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला; तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली; 26 मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे; 27 श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी व उघडेवागडेपणा, ह्या सर्वांमुळे मी अधिक आहे. 28 शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता ही आहे. 29 एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळवला गेला तर मला संताप येत नाही काय? 30 मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन. 31 आपल्या प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही. 32 दिमिष्कात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकार्याने मला धरण्याकरता दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा ठेवला होता. 33 तरी मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले, आणि त्याच्या हातांतून मी निसटलो. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India